बिनकामाचे लोक..; लेक गिरीजा ‘नॅशनल क्रश’ झाल्यानंतर वडील गिरीश ओक यांच्याकडून मोठी खंत व्यक्त

अभिनेत्री गिरीजा ओकचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या मुलीविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. यावेळी त्यांनी ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली आहे. गिरीजा ओक 'नॅशनल क्रश'चा टॅग मिळाला आहे.

बिनकामाचे लोक..; लेक गिरीजा नॅशनल क्रश झाल्यानंतर वडील गिरीश ओक यांच्याकडून मोठी खंत व्यक्त
Girish Oak and Girija Oak
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 26, 2026 | 8:44 AM

मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या एका मुलाखतीनंतर ‘नॅशनल क्रश’ बनली आणि सोशल मीडियावर असंख्य जण एकच प्रश्न विचारू लागले की, ‘निळ्या साडीतील ही अभिनेत्री आहे तरी कोण?’ गिरीजा ओक हे नाव मराठी कलाविश्वात जरी लोकप्रिय असलं तरी सोशल मीडियामुळे ती देशभरात प्रकाशझोतात आली. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, युट्यूब सर्वत्र ती ट्रेंड होत असतानाच काहींनी तिचे मॉर्फ केलेले, एडिट केलेले फोटोसुद्धा पोस्ट केले. याबद्दल खुद्द गिरीजाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. इंटरनेटवरच्या गोष्टी कायम असतात, त्या पुसल्या जात नाहीत, त्यामुळे असं कृत्य करू नका.. असं आवाहन तिने केलं होतं. त्यानंतर आता पहिल्यांदाच गिरीजाचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गिरीश ओक त्यांच्या मुलीबद्दल आणि ट्रोलिंगबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले.

“मला गिरीजाचं आणि तिच्या कामाचं अर्थातच खूप कौतुक आहे. एकंदर ती जे काही करते, त्याचं मला नेहमीच अप्रूप वाटतं. पण तिच्या फोटोंवर येणाऱ्या काही कमेंट्स अत्यंत वाईट असतात. बिनकामाची, रिकामटेकडी लोकं स्वत:ची ओळख लपवून असे कमेंट्स करतात. अशा लोकांची बौद्धिक कुवत किती आहे हे मला माहीत नाही, परंतु पडद्याआडून अशी टिप्पणी करणं चुकीचं आहे. ही वृत्तीच मला किळसवाणी वाटते. काही लोकांना या गोष्टींचा प्रचंड मानसिक त्रास होतो”, असं ते म्हणाले.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगबद्दल ते पुढे म्हणाले, “सोशल मीडियावर असे चुकीचे कमेंट्स करणाऱ्यांकडे काहीच कामधंदे नसतात. त्यांच्यावर कसलाच निर्बंध नाही. आपण काय लिहितोय, हेसुद्धा त्यांना कळत नाही. काहीजण सोशल मीडियावर सचिन पिळगांवकरांनाही ट्रोल करत होते. ते बालपणापासून या फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहेत. या ट्रोलर्सची त्यांच्याविषयी बोलण्याची तरी लायकी आहे का? हे सर्व पाहून मला खूपच वाईट वाटतं. अर्थात मी कितीही बोललो तरी हे काही थांबणारं नाहीये.”

याआधी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनीसुद्धा सचिन पिळगांवकरांना ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं होतं. “सचिनने आज जे स्थान मिळवलं आहे, ते काही फुकट किंवा वारशाने मिळावलेलं नाही. त्यासाठी त्याने रक्ताचं पाणी केलं आहे. अगदी लहान वयापासून त्याने दिग्दर्शक, सहाय्यक म्हणून काम केलं आहे. त्याला चित्रपटांशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा सखोल अभ्यास आहे. त्याच्या ज्ञानावर कुणी एक तरी बोट ठेवून दाखवेल का? कुणाची हिंमत आहे का? ट्रोल करणाऱ्यांना हे माहितच नसतं की समोरच्या माणसाने किती मेहनत घेतली आहे. आजकाल ट्रोलिंग हा लोकांच्या फावल्या वेळेचा छंदच झाला आहे”, असं ते म्हणाले होते.