
Govardhan Asrani Passed Away : बॉलिवुड जगतातील प्रसिद्ध विनोदी अभिनेते गोवर्धन असरानी यांचे वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचाराला साथ न दिल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने बॉलिवुडवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या जगाचा निरोप घेण्याआधी त्यांनी केलेल्या एका पोस्टची सगळीकडे चर्चा होत आहे. त्यांनी इन्स्टाग्रावर एक पोस्ट शेअर केली होती.
असरानी हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय होते. इन्स्टाग्रामवर ते त्यांचे जवळपास साडे सहा लाख फॉलोअर्स होते. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी ते याच मंचावर उत्स्फूर्तपणे शेअर करायचे. अगदी तरुण वयापासूनच त्यांनी सिनेसृष्टीत अभियन करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात साकारलेल्या भूमिकांचे काही व्हिडीओ ते आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर करायचे.
निधन होण्याच्या काही तास अगोदरच असरानी यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली होती. सध्या दिपावलीचा उत्सव सुरू आहे. या उत्सवानिमित्त त्यांनी त्यांच्या सर्व चाहत्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. इन्स्टाग्रामवर स्टोरीच्या माध्यमातून त्यांनी या शुभेच्छा दिल्या आहेत. या स्टोरीमध्ये त्यांनी एक फोटो पोस्ट केला असून या फोटोमध्ये प्रज्वलीत झालेले दिवे दिसत आहेत. सोबतच हॅपी दिवाळी असा एक संदेश या फोटोमध्ये देण्यात आला आहे.
असरानी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यांनी साकारलेल्या काही भूमिकांचे तर आजही कौतुक होते. त्यांनी शोले या चित्रपटात एका जेलरचे पात्र साकारले होते. या पात्राला ‘अंग्रोजों के जमाने का जेलर’ अशी विशेष ओळख आहे. त्यांनी साकारलेले हे पात्र आज अजरामर झालेले आहे. असरानी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर हे पात्र अमर करून टाकले आहे. त्यांनी अनेक विनोदी चित्रपटांत काम केलेले आहे.