Govinda: मुलांना काम मिळणार नाही..; गोविंदा-सुनीता वादात अभिनेत्याची एण्ट्री; दिला थेट सल्ला
Govinda: अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यातील कौटुंबिक वादावरून आता बिग बॉस फेम अभिनेत्याने सल्ला दिला आहे. बुधवारी सुनिताला फॅमिली कोर्टबाहेर पाहिलं गेलं. आता अभिनेत्याने व्हिडीओ पोस्ट करत म्हटलंय..

बॉलिवूडचा ‘हिरो नंबर 1’ गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता अहुजा यांच्यातील कौटुंबिक वाद जगजाहीर आहे. दोघांच्या नात्यातील मतभेद, सुनिता अहुजा यांचे आरोप आणि त्यानंतर गोविंदाची प्रतिक्रिया यामुळे हे प्रकरण सातत्याने चर्चेत आहे. बुधवारी सुनिता यांना जेव्हा फॅमिली कोर्टाबाहेर पाहिलं गेलं, तेव्हा या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चा आणखी तीव्र झाल्या. मात्र त्यानंतर काही वेळातच सुनिता यांनी घटस्फोट मागे घेतल्याचं वृत्त समोर आलं. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता बिग बॉस फेम अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे. अभिनेता एजाज खानने भावूक रील शेअर करत गोविंदाला पाठिंबा दिला आहे. त्याचसोबत सुनिता अहुजा यांना खासगी गोष्टी सार्वजनिक न करण्याचा सल्ला दिला आहे.
एजाज खानने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत गोविंदाची बाजू घेतली. व्हिडीओच्या सुरुवातीला तो सुनिता यांना ‘सुनिता भाभी’ असं संबोधत म्हणाला, याप्रकरणी भाष्ट करण्याचा त्याला अधिकार नसला तरी आता हे प्रकरण सार्वजनिक झाल्यामुळे एक धाकटा भाऊ म्हणून तो सल्ला देत आहे. एजाज पुढे म्हणाला, “सुनिता वहिनी, तुम्ही गोविंदाजींसोबत जे करत आहात ते चुकीचं आहे. तुम्ही केवळ त्यांच्यासोबतच नाही, तर तुमच्या मुलांसोबतही चुकीचं वागत आहात. अशा सार्वजनिक वक्तव्यांचे आणि वादांचे परिणाम तुमच्या मुलांनाही भोगावे लागू शकतात. या वादामुळे तुमच्या मुलांना भविष्यात इंडस्ट्रीमध्ये काम मिळवणं कठीण होऊ शकतं. कारण कॉर्पोरेट आणि प्रॉडक्शन हाऊसेस अनेकदा वादग्रस्त कुटुंबातील मुलांना काम देण्यास टाळाटाळ करतात.”
पहा व्हिडीओ-
एजाजने गोविंदाची बाजू घेताना तो स्वत:च्या मेहनतीने उभा राहिलेला कलाकार असल्याचं सांगितलं. तसंच कौटुंबिक वाद घराच्या चौकटीत सोडवण्याचा प्रयत्न करावास असंही त्याने सुचवलं. मुलं भविष्यात मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छित असतील, तर पालकांमधील सार्वजनिक वादाचा त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता एजाजने व्यक्त केली. गोविंदाच्या व्यक्तिमत्त्वाची प्रशंसा करताना एजाज पुढे म्हणाला, “एवढा मोठा सुपरस्टार असूनही गोविंदाने नेहमीच प्रत्येक गोष्टीला अत्यंत सभ्यतेनं आणि आदराने प्रतिसाद दिला आहे. सुनिता यांनी इतरांना त्यांची दिशाभूल करू देऊ नये आणि स्वत:ला हास्यास्पद बनवू देऊ नये. जेव्हा एखाद्याला राजाचा अपमान करायचा असतो, तेव्हा ते राणीचा वापर करतात. सुनिता वहिनी, लोक तुमचा वापर करत आहेत. गोविंदाची एक स्टार होते, आहेत आणि नेहमीच राहतील.”
दरम्यान गोविंदा आणि सुनिता यांच्या नात्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच सुनिता अहुजा यांना मुलगा यशवर्धनसोबत मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाबाहेर पाहिलं गेलं. या सर्व घडामोडींदरम्यान गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सुनिता अहुजा यांनी घटस्फोट मागे घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.