गुलजार, आर. डी. बर्मन, लता मंगेशकर अन् किशोर कुमार; बंगाली धून हिंदीत आली अन् अजरामर झाली, कोणतं गाणं?
Gulzar rd burman song : आर. डी. बर्मन यांनी आधी बंगाली गाण्यासाठी तयार केलेली एक धून गुलजार यांच्या मनात घर करून गेली. हीच चाल हिंदी गाण्यासाठी वापरण्याचा त्यांनी आग्रह धरला. पुढे याच धुनीवर तयार झालेलं एक गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. कोणतं आहे हे गाणं? चला मग जाणून घेऊयात..

एखादी चाल संगीतकाराने तयार केली आणि ती गाणं न बनताच बाजूला पडली, तर तिचं पुढे काय होतं? काही धुनी काळाच्या ओघात विस्मृतीत जातात, तर काहींना नवे शब्द मिळतात आणि त्या कायमच्या अमर होतात. संगीतकार आर. डी. बर्मन (पंचम दा) आणि गीतकार गुलजार यांच्या ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं’ या गाण्याबाबत अगदी असंच काहीसं घडलं होतं. ‘आंधी’ चित्रपटातील हे सुंदर गाणं मूळतः हिंदीसाठी तयार झालेलंच नव्हतं, तर गुलजार यांनी एका बंगाली गाण्याची ती चाल ऐकून ती हिंदी चित्रपटात वापरण्याचा हट्ट धरला होता.
बंगाली गाण्यासाठी तयार केली होती चाल
आर. डी. बर्मन यांनी ‘तेरे बिना जिंदगी से’ या गाण्याची ती प्रसिद्ध चाल आधी एका बंगाली गाण्यासाठी तयार केली होती. ‘जेते जेते पथे होलो देरी’ असं त्या बंगाली गाण्याचं नाव असून, ते दुर्गापूजेच्या निमित्ताने तयार करण्यात आलं होतं. जेव्हा गुलजार यांनी ती चाल पहिल्यांदा ऐकली, तेव्हा ती त्यांच्या मनावर राज्य करून गेली. त्यांना ती एवढी आवडली की, त्यांनी ती धून हिंदी चित्रपटासाठी वापरण्याचा आग्रह धरला.
गुलजार यांनी धून राखून ठेवण्यास सांगितलं
गुलजार यांनी पंचम दांना ती चाल इतरत्र कुठेही वापरू नका, तर ती हिंदी गाण्यासाठी राखून ठेवा, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. पुढे जेव्हा १९७५ मध्ये आलेला ‘आंधी’ चित्रपट आला, तेव्हा त्यातील दोन प्रमुख व्यक्तिरेखांच्या आयुष्यातील विरह, जुन्या आठवणी आणि अपूर्ण राहिलेल्या नात्याची हळवी भावना मांडण्यासाठी गुलजार यांनी याच चालीचा उत्तम वापर केला.
लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी आपल्या सुरेल आवाजात गायलेलं हे गाणं, आर. डी. बर्मन यांचे संगीत आणि गुलजार यांचे कसदार शब्द यामुळे ते भारतीय संगीत विश्वातील एक अजरामर कलाकृती बनलं. ‘आंधी’ चित्रपटात संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला. जर गुलजार यांनी ती बंगाली चाल ऐकून ती हिंदीत आणण्याचा हट्ट धरला नसता, तर कदाचित आपल्याला हे अप्रतिम गाणं ऐकायलाच मिळालं नसतं!