Sonu Sood: ‘गुटखा का खातोस, बंद कर हे’; सोनू सूदने त्याला फटकारलं, व्हिडीओ व्हायरल

सोनू सूदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो गुटखा खाणाऱ्या एका व्यक्तीला फटकारताना दिसत आहे.

Sonu Sood: गुटखा का खातोस, बंद कर हे; सोनू सूदने त्याला फटकारलं, व्हिडीओ व्हायरल
Sonu Sood: 'गुटखा का खातोस, बंद कर हे'; सोनू सूदने त्याला फटकारलं
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 16, 2023 | 2:34 PM

मुंबई: अभिनेता सोनू सूद हा गरजूंची मदत करण्यासाठी ओळखला जातो. कोरोना काळात त्याने असंख्य गरजूंची मदत केली. त्यानंतरही त्याने आजपर्यंत मदतीचा ओघ कायम ठेवला आहे. त्याच्या घराबाहेर दररोज असंख्य लोकांची रांग लागलेली असते. सोशल मीडियावरही तो बऱ्यापैकी सक्रिय असतो. सोनू सूदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो गुटखा खाणाऱ्या एका व्यक्तीला फटकारताना दिसत आहे.

सोनू सूदने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो कॉफी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला उतरतो. यावेळी त्याला एक व्यक्ती भेटते, जो गुटखा खात असतो. यावरून तो त्याला फटकारतो. “तू गुटखा खातोय का? गुटखा का खातोय? आधी ते खाणं बंद कर आणि तोंडातला गुटखा थुकून दे”, असं तो म्हणतो.

सोनू सूद त्या व्यक्तीला त्याचं नावंही विचारतो. नागेश असं नाव सांगितल्यावर सोनू त्याला समजावतो. “नागेश, आजच्यानंतर पुन्हा कधीच गुटखा खाऊ नकोस”, असं तो त्याला म्हणतो. इतकंच नव्हे तर पानवाल्या दुकानदाराला त्या व्यक्तीला गुटखा न विकण्याचा सल्ला देतो. “याला गुटखा देत जाऊ नको, याचं कुटुंब धोक्यात आहे. त्यापेक्षा याला कॉफी देत जा”, असं सोनू त्या दुकानदाराला म्हणतो.

सोनू सूद जेव्हा गाडीतून उतरतो तेव्हा म्हणतो, “रात्रीचे दहा-साडेदहा वाजले आहेत. आम्ही चंद्रपूरहून नागपूरला जातोय. रस्त्यात एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलोय.” सोनू सूद यावेळी दुकानदाराशीही गप्पा मारतो. त्याचं नाव विचारल्यावर दुकानदार अक्षय असं सांगतो. त्यावर सोनू मस्करीत त्याला विचारतो, “कोणता वाला अक्षय, कुमार वाला कि आणखी कोणता?”

चहावाल्याशी गप्पा मारताना तो त्याच्या व्यवसायाविषयीही काही प्रश्न विचारतो. सकाळपासून किती कप चहा विकलास असा प्रश्न विचारला असता तो चहावाला त्याला म्हणतो “दोनशे ते तीनशे”. त्यावर सोनू सूद त्याला म्हणतो, “मला पार्टनरशिप देऊन टाक”. याच मोकळ्या स्वभावामुळे सोनू सूदचं अनेकदा नेटकऱ्यांकडून कौतुक होतं.