धडा मिळाला..; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, मैत्रिणीच्याच पूर्व पतीशी केलंय लग्न

अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या पतीपासून वेगळी राहत असल्याची चर्चा आहे. लग्नाच्या तीन वर्षांतच ती घटस्फोट घेत असल्याचं म्हटलं जात आहे. या चर्चांदरम्यान आता हंसिकाने सोशल मीडियावर लिहिलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.

धडा मिळाला..; घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान अभिनेत्रीच्या पोस्टने वेधलं लक्ष, मैत्रिणीच्याच पूर्व पतीशी केलंय लग्न
हंसिका मोटवानी आणि तिचा पती सोहैल खटुरिया
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2025 | 10:29 AM

अभिनेत्री हंसिका मोटवानी गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. लग्नाच्या तीन वर्षांतच तिच्या वैवाहिक आयुष्यात समस्या निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर पतीसोबतच्या भांडणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ती तिच्या माहेरीच राहत असल्याचं कळतंय. घटस्फोटाच्या चर्चांवर हंसिका अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु आपल्या वाढदिवशी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान हंसिकाची ही पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. 9 ऑगस्ट रोजी तिने 34 वा वाढदिवस साजरा केला.

हंसिकाची पोस्ट-

वाढदिवशी हंसिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, ‘अत्यंत नम्र आणि कृतज्ञतेची भावना मनात आहे. प्रेमाने परिपूर्ण अशा प्रत्येक लहान क्षणासाठी मी आभारी आहे. या वर्षाने मला काही अशी शिकवण दिली आहे, ज्याचा मी विचारसुद्धा केला नव्हता. त्याचप्रमाणे माझ्यातली अशी ताकद यानिमित्ताने समोर आली, ज्याची मला कल्पना नव्हती. माझं हृदय भरून आलं आहे. वाढदिवसाच्या मॅजिकसाठी धन्यवाद.’ हंसिकाने या पोस्टद्वारे तिचं दु:ख मांडलंय, असा अंदाज नेटकरी वर्तवत आहेत.

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, हंसिका सध्या तिच्या आईसोबत राहतेय, तर सोहैल त्याच्या आईवडिलांसोबत वेगळा राहतोय. लग्नानंतर हंसिका तिच्या सासू-सासऱ्यांसोबत एकाच फ्लॅटमध्ये राहत होती. परंतु त्यांच्यासोबत हंसिकाचं पटत नसल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर हंसिका आणि सोहेल त्याच इमारतीत दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहू लागले होते. वेगळं राहिल्यानंतरही या दोघांमधील भांडणं कमी झाली नाहीत. अखेर हंसिका तिचं घर सोडून आईसोबत राहायला गेली. याप्रकरणी अद्याप हंसिकाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.

हंसिकाने सोहैल खटुरियाशी 2022 मध्ये धूमधडाक्यात लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या तीन वर्षांतच दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. सोहैलचं हे दुसरं लग्न होतं. त्याचं पहिलं लग्न हंसिकाचीच खास मैत्रीण रिंकी बजाजशी झालं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे रिंकी आणि सोहैलच्या लग्नात हंसिकासुद्धा उपस्थित होती. यामुळे हंसिकावर नंतर बरेच आरोप झाले होते. मैत्रिणीचाच संसार मोडून तिच्या पूर्व पतीशी हंसिकाने लग्न केलं, अशा चर्चांना उधाण आलं होतं. परंतु हंसिका आणि सोहैलने या आरोपांना फेटाळलं होतं.