Badass Ravi Kumar: ‘याला ऑस्करमध्ये पाठवा’; हिमेशच्या चित्रपटाच्या टीझरवर भन्नाट कमेंट्स

'निर्माता, दिग्दर्शक, लेखक, अभिनेता हिमेशच; पण प्रेक्षकही फक्त हिमेश', KRK ने उडवली खिल्ली

Badass Ravi Kumar: याला ऑस्करमध्ये पाठवा; हिमेशच्या चित्रपटाच्या टीझरवर भन्नाट कमेंट्स
Himesh Reshammiya
Image Credit source: Twitter
| Updated on: Nov 04, 2022 | 2:17 PM

मुंबई- प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक आणि गायक हिमेश रेशमियाने त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. ‘बडास रवी कुमार’ असं या चित्रपटाचं नाव आहे. यामध्ये हिमेशने रवी कुमार ही भूमिका साकारली आहे. 2014 मध्ये हिमेशने ‘द एक्सपोज’ या चित्रपटात रवी कुमारची भूमिका साकारली होती. याच भूमिकेचा हा नवा व्हर्जन आहे. या भूमिकेवरून गेल्या आठ वर्षांत असंख्य हास्यास्पद मीम्स व्हायरल झाले. आता पुन्हा एकदा हिमेश ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

‘बडास रवीकुमार’चा टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या टीझरमध्ये हिमेश बरेच अॅक्शन सीक्वेन्स करताना दिसतोय. ‘पठाण’च्या टीझरमधील दीपिका पदुकोणपेक्षा हिमेशचं अभिनय चांगलं आहे, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली.

स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर खान यानेसुद्धा हिमेशची खिल्ली उडवण्याची संधी सोडली नाही. ‘हिमेशच्या नव्या चित्रपटाची घोषणा झाली आहे. याचं लेखन, संगीत, दिग्दर्शन, निर्मिती सर्वकाही हिमेशनेच केलं आहे. याचा अभिनेतासुद्धा हिमेशच आहे आणि प्रेक्षकसुद्धा फक्त हिमेशच असेल’, असं ट्विट केआरकेनं केलंय.

‘हॉलिवूड आणि साऊथच्या चित्रपटांचं कौतुक पुरे झालं. आता आपला रवीकुमारच 14 ऑस्कर पुरस्कार घेऊन येणार’, असं एका युजरने लिहिलं. तर ‘राजामौलींचा RRR विसरा, ऑस्करच्या शर्यतीत रवीकुमार उतरणार आहे’, अशी कमेंट दुसऱ्याने केली.

हिमेशने नमस्ते लंडन, बॉडीगार्ड, तेरे नाम यांसारख्या चित्रपटांसाठी जबरदस्त संगीत दिलं आहे. 2007 मध्ये त्याने ‘आप का सुरूर’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर त्याने ‘कर्ज’, ‘कजरारे’, ‘हॅपी हार्डी और हीर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं.