
‘हमिदाबाईंची कोठी’ हे अशोक सराफ यांच्या व्यावसायिक रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं नाटक होतं. अशोक सराफ, नाना पाटेकर, नीना कुळकर्णी, भारती आचरेकर, प्रदीप वेलणकर, दिलीप कोल्हटकर असा त्यांचा नाटकाचा ग्रुप होता. या नाटकाच्या वेळीच अशोक सराफ यांनी बँकेची नोकरी सोडली. त्या आधीच ‘पांडू हवालदार’ आणि ‘रामराम गंगाराम’ यांसारख्या चित्रपटांमुळे अशोक सराफ प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले होते. या नाटकाशी संबंधित अशोक सराफ यांच्या अनेक आठवणी आहेत. अशीच एक घाबरवणारी आठवण त्यांनी ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात सांगितली आहे. त्यावेळी प्रसंगावधान राखत नाना पाटेकर यांनी अशोक सराफ यांचा जीव वाचवला होता.
एका गावात ‘हमीदाबाईंची कोठी’ या नाटकाचा प्रयोग होता. त्या गावात थिएटर म्हणावं असं काहीच नव्हतं. त्यामुळे एका मिलमध्ये स्टेज बांधून आणि समोर खुर्च्या ठेवून प्रयोगाचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु नाटक सुरू झाल्यावर स्टेजवर खाली बसून नट मंडळी संवाद बोलू लागली की समोरच्या प्रेक्षकांना काहीच दिसत नव्हतं. अखेर पहिल्या पाच मिनिटांमध्ये पडदा पाडावा लागला. कलाकारांनी सगळं नाटक उभं राहूनच करावं, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली होती. परंतु ते शक्य नव्हतं. हे बोलणं चालू असतानाच बाहेर प्रेक्षक बोंबाबोंब करू लागले. त्यावेळी अशोक सराफ यांना अनेकजण ओळखत असल्यामुळे प्रेक्षक चिडले तर सर्वांत आधी त्यांनाच टार्गेट करणार, हे नाना पाटेकरांना समजलं होतं. तेव्हा नानांनी युक्ती लढवत थेट अशोक सराफांचा हात पकडला आणि थिएटरच्या मागच्या बाजूने दोघं चिखल तुडवत निघाले.
दुसरीकडे थिएटरमध्ये अक्षरश: मारामारीला सुरुवात झाली होती. लोकांनी खुर्च्या तोडून टाकल्या होत्या. अशोक सराफ यांच्या साडेसात फुटांच्या फ्लायरच्या त्यांनी चिंध्याच केल्या होत्या. इतकंच नव्हे तर नाटकाच्या गाडीखाली झोपलेल्या नाटकाच्या ड्राइव्हरलाही बाहेर काढून मुस्काटात मारली होती. नाना पाटेकर आणि अशोक सराफ हे जेव्हा रस्त्यावर पोहोचले, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. अखेर एक सायकलरिक्षा नानांनी थांबवली आणि त्यात दोघं जण बसले. परंतु रिक्षावाला वयस्कर असल्याने त्याला दोघांचं वजन झेपत नव्हतं. अखेर नानांनी त्याला त्याला मागच्या बाजूला बसवलं आणि स्वत: रिक्षा ओढू लागले. आजही ती आठवण आली की माझ्या अंगावर शहारा येतो, असं अशोक सराफ म्हणतात.
“नाना नसता तर त्या लोकांनी मला मारलंच असतं. नाटक न झाल्याचा सर्व राग माझ्यावर काढला असता”, असं त्यांनी आत्मचरित्रात नमूद केलंय. रिक्षा ओढत नानांनी अशोक सराफ यांना एका रेस्ट हाऊसवर आणलं. तिथे एका खोलीत बंद करून ठेवलं. मग हाफपँट आणि डोक्यावर रुमाल बांधून पुन्हा बाकीच्या लोकांच्या मदतीसाठी थिएटरच्या दिशेनं निघाले. त्यावेळी नानांनी जे केलं त्याची परफेड मी कधीच करू शकत नाही, अशी भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केली.