Mika Singh: ..तर मी गाणंच सोडून देईन, दलेर मेहंदी स्टेजवर दारू पिऊन आल्याचा भाजप मंत्र्याचा आरोप; मीका सिंगचं ओपन चॅलेंज

भर कार्यक्रमात मद्यपान करून परफॉर्म केल्याचा आरोप करत भाजप मंत्र्यांनी गायक दलेर मेहंदी यांचा स्टेजवरच अपमान केला. या घटनेवर आता दलेर मेहंदी यांचा भाऊ मीका सिंगची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Mika Singh: ..तर मी गाणंच सोडून देईन, दलेर मेहंदी स्टेजवर दारू पिऊन आल्याचा भाजप मंत्र्याचा आरोप; मीका सिंगचं ओपन चॅलेंज
Mika Singh and Daler Mehndi
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 21, 2026 | 12:29 PM

प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी सध्या उत्तराखंडमधील एका कार्यक्रमामुळे चर्चेत आहेत. कार्यक्रमादरम्यान उत्तराखंडचे मंत्री सुबोध उनियाल यांनी दलेर मेहंदी यांच्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त करत त्यांना मंचावरच सुनावलं होतं. यावेळी गायकाने मद्यपान केल्याचा आरोपही करण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मनोरंजनविश्वातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आता दलेर मेहंदी यांचे भाऊ आणि गायक मीका सिंग यांनी त्यांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली आहे. ‘दलेर मेहंदी दारू पिताना दिसले, तर मी गाणं सोडून देईन’, असं खुलं आव्हानच मीकाने दिलं आहे.

मीका सिंगने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडली. दलेर मेहंदी गेल्या 30 वर्षांपासून संगीतविश्वात लोकप्रिय आहेत. मात्र, इतक्या वर्षांत त्यांना कधीही दारू पिताना पाहिलं आहे का, असा प्रश्न मीकाने उपस्थित केला. त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतही कधी दारूचा ग्लास दिसला आहे का, असं विचारत त्याने आरोपांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ‘जे तुम्ही स्वतः पाहिलेलं नाही, त्याबद्दल इतक्या ठामपणे कसं बोलू शकता?’ असा सवालही मीकाने केला. दलेर मेहंदी मद्यपान करतात, या आरोपांना त्याने स्पष्टपणे विरोध केला. त्याच्या मते, पुराव्याशिवाय एखाद्या कलाकाराबद्दल अशा बातम्या पसरवणं चुकीचं आहे.

Loading...

दलेर मेहंदी यांच्या सादरीकरणावर टीका होत असताना मीकाने कलाकारांच्या व्यावसायिक बांधिलकीचाही मुद्दा मांडला. अनेकदा कलाकार एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आश्वासन देतात. त्यानंतर तब्येत बरी नसली, तरी दिलेला शब्द पाळण्यासाठी मंचावर जातात, असं त्याने सांगितलं. स्वतःला 104 अंश ताप असला, तरी आधीच दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी कार्यक्रम करावा लागू शकतो, असं उदाहरण मीकाने दिलं. दलेर मेहंदी यांनीही अशाच प्रकारे आयोजकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी कार्यक्रम केला असण्याची शक्यता त्याने व्यक्त केली.

मीका सिंगने आपल्या भावाच्या प्रकृतीविषयी बोलताना गेल्या दोन वर्षांपासून त्यांची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं. ते अजूनही प्रकृतीतून सावरत असून, अशा परिस्थितीतही आपल्या बँडसोबत कार्यक्रम करत असल्याचं त्याने नमूद केलं. त्यामुळे त्यांच्या सादरीकरणावर टीका करण्यापूर्वी त्यांच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे, अशी भूमिका मीकाने मांडली.

नेमकं काय घडलं होतं?

18 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील टिहरी जिल्ह्यातील कुंजापुरी मेळ्यात दलेर मेहंदी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवरात्रीच्या उत्सवाचा भाग असलेल्या या कार्यक्रमादरम्यान मंत्री सुबोध उनियाल मंचावर आले आणि त्यांनी गायकाच्या सादरीकरणावर नाराजी व्यक्त केली. दलेर मेहंदी यांनी मद्यपान करून कार्यक्रम सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us