
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या लोकप्रिय मालिकेबद्दल गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा होती, ती अखेर खरी ठरली आहे. या मालिकेत कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकर आता यापुढे मालिकेत दिसणार नाही. ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ या मालिकेतून ईशा केसकरची एक्झिट होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून होत्या. त्यानंतर मालिकेचा नवीन प्रोमो पाहून या चर्चांना आणखी हवा मिळाली होती. आता ईशाच्या एक्झिटवर शिक्कामोर्तब झाला आहे. या मालिकेत ईशाची जागा अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर घेणार आहे. या मालिकेत ईशा गेल्या दोन वर्षांपासून कलाची भूमिका साकारत होती. आता नव्या गोष्टीसह मालिकेत सुकन्या पाटील या नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. हे नवं पात्र नक्षत्रा मेढेकर साकारणार आहे.
या मालिकेत कलाला त्यांच्या घराचं सत्य अद्वैतला सांगायचं असतं. त्यासाठी ती चिठ्ठी लिहिते आणि अद्वैतपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. मात्र रस्त्यातच तिचा अपघात होतो. त्यावेळी मालिकेत सुकन्याची एण्ट्री होते. सुकन्या कलाला रुग्णालयात घेऊन जाते. कलाच्या अपघाताबद्दल अद्वैतला समजताच तो रुग्णालयात धाव घेतो. कला अद्वैतला अंगाई गायला सांगते आणि तेव्हाच ती अखेरचा श्वास घेते. तर दुसरीकडे सुकन्याला हृदयविकार असतो आणि तिला कलाचं हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं. कलाच्या मृत्यूच्या सहा महिन्यानंतर सुकन्या आणि अद्वैतची भेट होते आणि तिथून मालिकेत नवीन वळण येतं.
मालिकेतील सुकन्या पाटील ही व्यवसायाने नर्स आणि अनेक गुपितं मनात साठवून शांत आयुष्य जगणारी मुलगी आहे. रुग्णांची सेवा करायला तिला आवडतं म्हणूनच तिने हे क्षेत्र निवडलंय. या निमित्ताने लोकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचं निमित्त होता येतं याचा तिला आनंद आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री नक्षत्रा मेढेकर सुकन्या पाटील ही भूमिका साकारणार असून जवळपास चार वर्षांनंतर ती मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे.
ईशा केसकरने तिच्या एक्झिटबद्दल अद्याप कोणती प्रतिक्रिया दिली नसली तरी चाहत्यांनी या प्रोमोवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘आम्ही आता ही मालिका पाहणार नाही’, असं एकाने म्हटलंय. तर ‘कलाची भूमिका बदलण्याची गरजच नव्हती, आता मालिका आणखी रटाळ होणार’, असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘मालिकेत अद्वैत आणि कला असतील तरच आम्ही बघू’, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.