Jaat Collection: सनी देओलच्या ‘जाट’ची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कामगिरी; ‘गदर 2’लाही टाकणार मागे?

अभिनेता सनी देओलचा बहुचर्चित 'जाट' हा चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्याच्यासोबत रणदीप हुड्डा आणि सैयामी खेर यांच्याही भूमिका आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केल्याचं समजतंय.

Jaat Collection: सनी देओलच्या जाटची पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कामगिरी; गदर 2लाही टाकणार मागे?
Sunny Deol in Jaat movie
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2025 | 8:38 AM

‘गदर 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दीड वर्षानंतर अभिनेता सनी देओलचा ‘जाट’ हा ॲक्शन थ्रिलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 10 एप्रिल रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला असून कमाईसुद्धा तगडी झाली आहे. गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित ‘जाट’ हा साऊथ ॲक्शन मसालापट असल्याचं म्हटलं जात आहे. पहिल्या दिवशी थिएटरमध्ये चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर भरभरून पोस्ट लिहिले आहेत. सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्या दमदार कामगिरीने प्रेक्षक प्रभावित झाले आहेत. बॉक्स ऑफिसवर ‘जाट’ची स्पर्धा अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ आणि ‘अकाल’ या पंजाबी चित्रपटांशी आहे. तर दुसरीकडे सलमान खानचा ‘सिकंदर’सुद्धा अद्याप थिएटरमध्ये आहे. असं असतानाही सनी देओलच्या ‘जाट’ने कमाल केली आहे.

‘सॅकनिल्क’ने दिलेल्या माहितीनुसार, ‘जाट’ने पहिल्या दिवशी 9.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. हे सुरुवातीचे आकडे असल्याने यात पुढे आणखी थोडाफार बदल होऊ शकतो. ‘जाट’ने प्रदर्शित होताच अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. हा सनी देओलच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. याआधी त्याच्या ‘गदर 2’ने 40.10 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. याशिवाय ‘जाट’ने आणखी एक विक्रम रचला आहे. ‘छावा’, ‘सिकंदर’ आणि ‘स्काय फोर्स’नंतर हा 2025 मधला सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.

पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

  • छावा- 33.10 कोटी रुपये
  • सिकंदर- 27.50 कोटी रुपये
  • स्काय फोर्स- 15.30 कोटी रुपये
  • जाट- 9.50 कोटी रुपये

‘जाट’ या चित्रपटात सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्यासोबतच विनीत कुमार सिंह, रेजिना कॅसेंड्रा, जगपती बाबू, सैयामी खेर आणि रम्या कृष्णन यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचं बजेट 100 कोटी रुपये आहे. या चित्रपटातील सनी देओलची कामगिरी, शिट्ट्या आणि टाळ्यांचा कडकडाट मिळवणारे संवाद आणि जबरदस्त ॲक्शन सीन्स या जमेच्या बाजू ठरत आहेत. सनी देओलच्या ‘गदर 2’ने देशभरात तब्बल 691 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता त्याचा ‘जाट’ कमाईचे कोणते नवीन विक्रम रचणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.