‘तो तुरुंगात बसून मला धमकी..’; जॅकलीनची थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार

सुकेश चंद्रशेखरच्या धमक्यांपासून संरक्षण मिळावं यासाठी जॅकलीनने दिल्ली कोर्टात धाव घेतली होती. इतकंच नव्हे तर सुकेशने तिला त्याच्या जाळ्यात अडकवल्याचं कारण देत आपण निष्पाप बळी ठरल्याचं तिने म्हटलं होतं.

तो तुरुंगात बसून मला धमकी..; जॅकलीनची थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
जॅकलिन फर्नांडिसचा जन्म बहरीनमध्ये झाला. ती श्रीलंकन ​​वडिलांची आणि मलेशियन आईची मुलगी आहे. त्यामुळे त्याच्याकडे श्रीलंकेचे नागरिकत्व आहे. त्यामुळे तिला भारतीय निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. कारण मतदानाचा अधिकार फक्त भारतीय नागरिकांना दिला आहे.
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2024 | 12:20 PM

मुंबई : 13 फेब्रुवारी 2024 | अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरविरोधात तक्रार दाखल केली आहे. तुरुंगातून छळ करत असून धमक्या देत असल्याची तक्रार जॅकलीनने सुकेशविरोधात केली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलीनने दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे ही तक्रार केली आहे. याशिवाय तिने क्राइम ब्रांचच्या विशेष पोलीस आयुक्तांनाही पत्र लिहिलं आहे. एका विशेष युनिटला जॅकलीनच्या या तक्रारीची प्राथमिक चौकशी करण्यास सांगितलं गेलंय.

जॅकलीनने पत्रात काय लिहिलं?

‘मी एक जबाबदार नागरिक असून अनवधानाने या प्रकरणात अडकले आहे. या प्रकरणाचा दूरगामी परिणाम आपल्या न्यायिक व्यवस्थेच्या पावित्र्यावर आणि राज्यातील कायद्यावर होत आहे. विशेष सेलने नोंदवलेल्या खटल्यातील फिर्यादी साक्षीदार म्हणून मी तुम्हाला हे पत्र लिहिलं आहे. मानसिक दबाव आणि धमक्या मिळत असल्याने मी हे पत्र लिहित आहे. सुकेश हा व्यक्त या प्रकरणातील आरोपी आहे. मंडोली कारागृहात बसून तो पब्लिक डोमेनद्वारे खुलेपणाने धमकावत आहे’, अशी तक्रार जॅकलीनने या पत्राद्वारे केली आहे.

पत्रातून जॅकलीनने पोलीस आयुक्तांना तातडीने याप्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली आहे. यामुळे माझी सुरक्षा धोक्यात असून कायदेशीत प्रक्रियांची अखंडताही धोक्यात आल्याचं तिने म्हटलंय. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (MCOCA) खटल्यात फिर्यादी साक्षीदार म्हणून माझं संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी सुकेशविरोधात आयपीसी कलमांअंतर्गत एफआयआर नोंदवावा, अशी विनंती जॅकलीनने केली आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात जॅकलीनने सुकेशला पत्र, मेसेज किंवा स्टेटमेंट पाठवण्यापासून रोखण्यासाठी निर्देश मागण्यासाठी दिल्ली न्यायालयात धाव घेतली होती. सुकेशशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या मनी लाँडरिंगप्रकरणाशी संबंधित आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासल्या जाणाऱ्या एका एफआयआरमध्ये जॅकलीन साक्षीदार आहे. या प्रकरणात सुकेशने मला गोवलं, असं म्हणत जॅकलीनने तिच्यावरील सर्व आरोप मागे घेण्याची विनंती दिल्ली हायकोर्टात केली होती. या आरोपांना प्रतिक्रिया देताना सुकेशने थेट जॅकलीनला धमकी दिली होती. जॅकलीनविरोधातील सर्व पुरावे समोर आणण्याची धमकी त्याने दिली होती. याप्रकरणी चौकशीत पक्षपात झाला असून संबंधित व्यक्तीला बचावण्याचा मी प्रयत्न करत होतो, असंही त्याने म्हटलं होतं.