
यावर्षी स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमी एकाच दिवशी साजरा करण्यात आला. त्यानंतर 16 ऑगस्ट रोजी देशभरात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा झाला. आपल्या आगामी ‘परम सुंदरी’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त अभिनेत्री जान्हवी कपूर मुंबईतल्या एका दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहिली. या कार्यक्रमात दहीहंडी फोडतानाचा तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. याच व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोलसुद्धा केलं. दहीहंडी फोडताना ‘भारत माता की जय’ अशी घोषणा केल्याने जान्हवीवर टीका केली जात आहे. आता या ट्रोलिंगवर जान्हवीने प्रतिक्रिया दिली आहे. इन्स्टा स्टोरीमध्ये तिने संपूर्ण व्हिडीओ पोस्ट करत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘भारत माता की जय’ अशी घोषणा देऊन दहीहंडी फोडल्याने नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. ’15 ऑगस्ट काल होता दीदी, आज दहीहंडी आहे, कृष्ण कन्हैय्या की जय बोलायला पाहिजे होतं’, असं एकाने म्हटलं. तर ‘दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात हिला भारत माता की जय आठवतंय’, असं दुसऱ्याने लिहिलं. ‘दहीहंडीचं भारत मातेशी काय देणंघेणं’, असाही सवाल अनेकांनी केला. या ट्रोलिंगवर जान्हवीने मौन सोडलं आहे.
जान्हवीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये संपूर्ण क्लिप शेअर केली असून त्यामध्ये भाजप आमदार राम कदम आधी ‘भारत माता की जय’ असं म्हणताना दिसत आहेत. त्यानंतर जान्हवीसुद्धा ‘भारत माता की जय’ अशी घोषणा देते. या व्हिडीओसह तिने लिहिलंय, ‘संदर्भासाठी हा पूर्ण व्हिडीओ इथे शेअर करतेय. त्यांनी बोलल्यानंतर नाही बोलले असते तर समस्या आणि बोलले तरी व्हिडीओ कट करून मीम मटेरियल बनवतात. फक्त जन्माष्टमीच्या दिवशी नाही तर रोज बोलणार.. भारत माता की जय.’
जान्हवीच्या ‘परम सुंदरी’ या चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. गेल्या काही दिवसांपासून ती आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मिळून जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच हे दोघं तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी गेले होते. हा चित्रपट येत्या 29 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जान्हवीने दाक्षिणात्य तरुणीची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवली आहे.