‘सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात..’; ‘फुले’ चित्रपटावरून जयंत पाटलांनी सुनावलं

'फुले' या चित्रपटातील काही दृश्यांवर आणि संवादांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटलांनी सेन्सॉर बोर्डाला सुनावलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे.

सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात..; फुले चित्रपटावरून जयंत पाटलांनी सुनावलं
जयंत पाटील, प्रतीक गांधी आणि पत्रलेखा
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 10, 2025 | 11:11 AM

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित ‘फुले’ या चित्रपटावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता सेन्सॉर बोर्डानेही चित्रपटातील काही दृश्यांबाबत आक्षेप घेतला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंवर पोस्ट लिहित त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. ‘नामदेव ढसाळ कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती’, असा टोला त्यांनी लगावला आहे.

जयंत पाटील यांची पोस्ट-

‘काश्मीर फाइल्स, द केरळ फाइल्ससारख्या प्रचारकी चित्रपटांवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मात्र ‘फुले’सारख्या चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. Who is Namdeo Dhasal? (नामदेव ढसाळ कोण आहेत) असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या सेन्सॉर बोर्डात किती विद्वान लोकं बसतात याची कल्पना आली होती. पण आता ‘फुले’ चित्रपटावर आक्षेप घेतला जात आहे. त्यातून सेन्सॉर बोर्डाची मानसिकता लक्षात येते,’ अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

दिग्दर्शकांनी घेतली छगन भुजबळांची भेट

‘फुले’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी नुकतीच माजी मंत्री छगन भुजबळ यांचीही या विषयावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली. संवेदनशील विषयावर बनवलेल्या चित्रपटामुळे मतभेद निर्माण होतील असं त्यांना वाटलं होतं का, असा प्रश्न त्यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “आम्ही अशा प्रकारच्या शंका आणि भीती मनात ठेवून चित्रपट बनवायला घेत नाही. जेव्हा तुम्ही ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्यासारख्या निर्भिड व्यक्तीमत्त्वांबद्दल बोलता, तेव्हा तुम्ही अशा प्रकारची भीती बाळगणार असाल, तर तुम्ही चित्रपट बनवण्यास पात्र नाही.”

ब्राह्मण महासंघाच्या टीकेवर दिग्दर्शकांचं रोखठोक उत्तर

“जे तुम्हाला करायचंय ते प्रामाणिकपणे करा, तथ्यांशी जोडून राहा, संशोधन करा, अतिशयोक्ती करू नाक आणि कोणत्याही प्रकारे ते अवास्तव वाटू देऊ नका. कारण त्यांचं जीवनच इतकं नाट्यमय आहे की तुम्हाला कोणत्याही सिनेमॅटीक लिबर्टीची गरज नाही. किंबहुना तुम्हाला बऱ्याच गोष्टी कमी दाखवाव्या लागतील, कारण इतकं त्यांचं आयुष्य नाट्यमय होतं. मी स्वत: ब्राह्मण आहे. जर मला जातीभेदावर चित्रपट बनवायचा असेल तर मी स्वाभाविकपणे सर्वांत आधी स्वत:ला प्रश्न विचारेन की मी योग्य काम करतोय की नाही? त्यासाठी मी इतर ब्राह्मणांना माझ्याकडे येऊन प्रश्न विचारण्याची किंवा माझ्या हेतूंवर शंका उपस्थित करण्याची संधी देणार नाही. त्यांना हे माहीत असलं पाहिजे की तुम्ही रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवर प्रश्न उपस्थित करू शकत नाही. डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांचं कल्याणच हवं असतं”, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.