33 वर्षांपासून बस, ट्रॅक्टर आणि रिक्षामध्ये वाजतं हे गाणं, इतकं सुपरहिट की ऐकू आलं तरी लोक दिवसभर गुणगुणतात

33 वर्षांनंतरही प्रत्येक रस्त्यांवरील बसमध्ये वाजतंय जूही चावलाचं हे गाणं; इतकं सुपरहिट की एकदा सुरु झालं लोक त्याचा आवाज वाढवून ते गाणं ऐकतात. आजही प्रचंड सुपरहिट.

33 वर्षांपासून बस, ट्रॅक्टर आणि रिक्षामध्ये वाजतं हे गाणं, इतकं सुपरहिट की ऐकू आलं तरी लोक दिवसभर गुणगुणतात
Image Credit source: Social media
| Updated on: Sep 15, 2026 | 8:08 PM

90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हटलं की जूही चावलाचं नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या अभिनयासोबतच जूही चावलावर चित्रित झालेली अनेक गाणीही प्रचंड गाजली. त्यापैकीच एक रोमँटिक गाणं आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. विशेष म्हणजे, तब्बल 33 वर्षांनंतरही हे गाणं रस्त्यांवर धावणाऱ्या बसमध्ये ऐकायला मिळतं, यावरून त्याची लोकप्रियता किती मोठी आहे याचा अंदाज येतो.

हे गाणं आहे ‘मुझसे मोहब्बत का इजहार…’, जे 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या हम हैं राही प्यार के या चित्रपटातील आहे. या चित्रपटात जूही चावला हिच्यासोबत आमिर खान मुख्य भूमिकेत होता. दमदार कथेसोबतच चित्रपटातील संगीतही त्यावेळी प्रचंड लोकप्रिय झालं होतं.

90 च्या दशकात गाजलं होतं गाणं

‘मुझसे मोहब्बत का इजहार…’ हे जूही चावला आणि आमिर खान यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. 90 च्या दशकात या रोमँटिक गाण्याची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ होती. अनेक जण म्युझिक सिस्टमवर हे गाणं मोठ्या आवाजात ऐकत असत. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम असून, रोडवेज बसमध्ये प्रवास करताना हे गाणं ऐकायला मिळत असल्याचं सांगितलं जातं.

या गाण्याला अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांच्या मधुर आवाजाची साथ लाभली. दोघांच्या आवाजातील रोमँटिक अंदाजामुळे गाण्याला एक वेगळीच मोहकता मिळाली. त्यामुळे हे गाणं 90 च्या दशकातील लोकप्रिय रोमँटिक ट्रॅक्सपैकी एक ठरलं.

नदीम-श्रवण यांच्या संगीताची जादू

या गाण्याचं संगीत प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांनी दिलं होतं तर गाण्याचे बोल गीतकार समीर यांनी लिहिले होते. मधुर संगीत, सुंदर शब्द आणि अलका याज्ञिक-कुमार सानू यांच्या आवाजाचा सुरेल संगम यामुळे ‘मुझसे मोहब्बत का इजहार…’ हे गाणं आजही जुन्या आठवणी ताज्या करतं.

हम हैं राही प्यार केच्या प्रदर्शनाला तीन दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. जूही चावला आणि आमिर खानची केमिस्ट्री, नदीम-श्रवण यांचं संगीत आणि अलका-कुमार सानूचा आवाज यामुळे हे गाणं आजही 90 च्या दशकातील संगीतप्रेमींसाठी खास आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us