कैलाश खेर यांनी चक्क तीन महिने पाळलेला कोब्रा नाग, सोबतच झोपायचे, सोडून देण्यामागचं कारणही सांगितलं
प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या आयुष्यातील एक धक्कादायक किस्सा समोर आला आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी तब्बल तीन महिने कोब्रा पाळला होता. त्याला बॅगेत घेऊन फिरण्यापासून ते रजाईत सोबत झोपण्यापर्यंतचे अनुभव त्यांनी सांगितले. मात्र, नंतर हा कोब्रा सोडण्याचा निर्णय का घेतला?

आपल्या दमदार आवाजाने आणि अनोख्या गायकीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक कैलाश खेर यांच्याबद्दल एक असा किस्सा समोर आला आहे, जो ऐकून कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल. आजवर त्यांच्या गाण्यांनी चाहत्यांना वेड लावलं आहे. मात्र, वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी कैलाश खेर यांनी जे केलं होतं, त्याची कल्पनाही कोणी करू शकणार नाही. त्यांनी चक्क एका विषारी कोब्राला आपला सोबती बनवलं होतं. इतकंच नाही तर हा कोब्रा त्यांच्यासोबत गोधडीत झोपायचा आणि बॅगेतून त्यांच्यासोबत फिरायचादेखील.
तीन महिने कोब्रा होता सोबतीला
रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये कैलाश खेर यांनी हा धक्कादायक अनुभव सांगितला. साधारण 20 वर्षांचे असताना एक कोब्रा तब्बल तीन महिने त्यांच्यासोबत राहिला होता. थंडीच्या दिवसांत ते त्याला स्वतःसोबत गोधडीत घेऊन झोपायचे. कुठे बाहेर जायचं असेल, तर त्याला बॅकपॅकमध्ये ठेवून सोबत घेऊन जायचे. एका विषारी सापासोबत इतक्या सहजपणे राहणं हीच मुळात आश्चर्याची गोष्ट आहे.
भूक लागली की फुत्कार मारायचा
कैलाश खेर यांनी सांगितलं की, त्या कोब्रासोबत त्यांचं एक वेगळंच नातं तयार झालं होतं. त्याला भूक लागली आणि बराच वेळ खायला मिळालं नाही, तर तो फुत्कार मारायचा. त्यातून आपल्याला भूक लागल्याचं तो जणू सांगायचा. त्यावेळी कैलाश त्याला पकडून ‘खूप मस्ती करतोय’ असं म्हणायचे आणि पुन्हा बॅगेत ठेवायचे.
एका विचाराने कोब्राला सोडलं
मात्र, पुढे त्यांनी या कोब्राला सोडण्याचा निर्णय घेतला. कारण त्याला खायला देण्यासाठी उंदीर मारावे लागत होते. एका जीवाला वाचवण्यासाठी दुसऱ्या जीवाचा बळी घेणं त्यांना योग्य वाटलं नाही. त्यामुळे त्यांनी कोब्राला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडलं.
विशेष म्हणजे, कोब्राचे दात काढलेले असले तरी त्याच्या फुत्कारात विष असू शकतं, असंही त्यांनी सांगितलं. संतांचा सहवास, जंगल आणि डोंगरांमध्ये भटकंती यामुळे लहान-मोठ्या जीवांची भीती वाटत नव्हती. त्यामुळेच आपण त्या वयात कोब्रासोबत इतके सहज राहू शकलो, असं कैलाश खेर यांनी सांगितलं.