निवडणुकीच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, सगळंच काढलं, म्हणाले गेल्या 75 वर्षांमध्ये..
निवडणूक प्रक्रियेवर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात येत आहे, तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा सुरू आहे. यावर प्रतिक्रिया देताना आता शेलार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

काँग्रेसकडून वारंवार निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे, तसेच विरोधी पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू आहे. यासंदर्भात विरोधी पक्षांकडून अनेकदा जोरदार आंदोलनं देखील करण्यात आले. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना आता भाजप नेते आशिष शेलार यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला असं वाटतं की निवडणुका म्हटल की 3 गोष्टी समोर येतात, मतदान यंत्रणा, मतदार आणि निकाल या संदर्भात 75 वर्षांत देशात काय घडले? याचा विचार करणे ही काळाची गरज आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?
मला असं वाटतं की निवडणुका म्हटल की 3 गोष्टी समोर येतात, मतदान यंत्रणा, मतदार आणि निकाल या संदर्भात 75 वर्षांत देशात काय घडले? याचा विचार करणे ही काळाची गरज आहे. या आधी जुन्या निवडणुकांमध्ये अनेकदा घोळ झाला, त्यावेळेस मात्र आज जो विरोधी पक्ष आहे, तो कधी बोलला नाही. मग त्यावेळी ते का बोलले नाहीत? असा सवाल यावेळी शेलार यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही विरोधक असताना कधीही निवडणूक व्यवस्थापनाला प्रश्न विचारला नाही? निवडणुका लढवत राहिलो. एवढी मोठी निवडणूक यंत्रणा या देशात उभा करणे हे त्यावेळच्या राजकीय लोकांचं यश आहे. मात्र सध्या विरोधी पक्ष जो करत आहे, तो ढोंगीपणा आहे. लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. मतदार हुशार आहे. या आधीही ज्या निवडणुका झाल्या त्यावर आक्षेप घेतला गेला, त्यावेळी देखील अनेक चुका झाल्या होत्या. त्या निवडणुकांवर या विरोधकांना बोलावसं वाटलं नाही, ही शोकांतिका आहे असा हल्लाबोल यावेळी आशिष शेलार यांनी विरोधकांवर केला आहे.
इंदिरा गांधी यांच्या वेळी सुद्धा काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते, त्यावेळी पंजा हे चिन्ह काँग्रेसला मिळालं होतं. मला असं वाटतं की पक्ष आणि चिन्ह पाळवणं त्यावेळी सुद्ध सुरू होतं, असंही यावेळी शेलार यांनी म्हटलं आहे.
