काँग्रेसमध्ये लवकरच अनेक बाहुबली नेत्यांचा प्रवेश, सपकाळ यांनी गुपित फोडलं; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठ पक्ष प्रवेश होतील. मोठी वेटिंग लिस्ट आहे. कोणाला पक्षात घ्यायचं ते आम्ही ठरवू, असा मोठा दावा, सपकाळ यांनी केला.

Congress And Harshwardhan Sapkal : राज्याच्या राजकारणात नेहमीच काहीतरी घडतं. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी नेहमीच झडत असतात. सध्या राज्यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक, दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असं विधान केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. एकीकडे या सर्व चर्चा झडत असताना दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. भविष्यकाळात काँग्रेसमध्ये अनेक मोठे पक्षप्रवेश होणार आहेत, असा दावा त्यांनी केल्याने आगामी काळात काहीतरी मोठं घडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
इंडिया आघाडीतील सगळे पक्ष याला विरोध करणार
हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत जाऊ शकतो, हा गट मतदारसंघाच्या पुनर्रचना विधेयकालाही पाठिंबा देऊ शकतो, असा दावा केला जातोय. यावर बोलताना, देशात 50 टक्के आरक्षण काँग्रेसनेच आणलं. 2029 सालापासून महिला आरक्षण विधेयक लागू करा ही काँग्रेसची मागणी आहे. मात्र आरक्षणाच्या नावाखाली डिलीमीटेशन बिल आणण्याचा भाजपचा डाव आहे. इंडिया आघाडीतील सगळे पक्ष याला विरोध करणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सोबतच भाजपची पाठराखण करतांना मित्रपक्षांनी विचार करावा, असा सल्लाही सपकाळ यांनी मित्रपक्षांना दिला. आम्ही भाजपासोबत जाणार नाही, असे सुप्रिया सुळेंनी याआधी सांगितलेलं आहे, असंही हर्षवर्धन सपकाळ सावर्जुन म्हणाले.
येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठ पक्ष प्रवेश
येणाऱ्या 2029 साली लोकसभा तसेच विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला लक्षात घेऊन अनेक नेतेमंडळी सोईच्या पक्षात उडी मारू शकतात. यावरच बोलताना, येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये मोठ पक्ष प्रवेश होतील. मोठी वेटिंग लिस्ट आहे. कोणाला पक्षात घ्यायचं ते आम्ही ठरवू, असा मोठा दावा, सपकाळ यांनी केला. दरम्यान, हा पक्षप्रवेश नेमका कोणाचा असेल, कोणता नेता काँग्रेसमध्ये उडी मारणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
