Beed News: विरोधात बातम्या का करतो? तुला ट्रक खाली टाकून जीवे मारतो… राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची पत्रकाराला धमकी
एकीकडे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असतानाच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकानेच स्थानिक पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याची कथित ऑडियो क्लीप व्हायरल झाली आहे.

Beed News: संतोष देखमुख हत्या प्रकरण, महादेव मुंडे प्रकरण, अवैध धंदे यांमुळे बीड जिल्हा नेहमीच चर्चेत असतो. खून, मारामाऱ्या, धमक्यांच्या घटना बीडमध्ये वारंवार घडत असतात. एकीकडे गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत असतानाच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेवकानेच स्थानिक पत्रकाराला जिवे मारण्याची धमकी दिल्याची कथित ऑडियो क्लीप व्हायरल झाली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून पत्रकाराला धमकी!
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगरसेवक शेख बिलाल याची एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे. आमच्या विरोधात बातम्या का करतो? असे म्हणत स्थानिक पेपरच्या पत्रकाराला अश्लील शिवीगाळ केली आहे. बीडमधल्या कुठल्याच पत्रकारामध्ये माझ्याविरोधात बातमी टाकायचा दम नाही, असं बिलाल शेख या ऑडिया क्लीपमध्ये म्हणत आहेत.
तसेच तुला ट्रक खाली टाकून जीवे मारतो अशी धमकीही त्याने या पत्रकाराला दिली आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून लोकप्रतिनिधीच अशाप्रकारे धमक्या देऊ लागले तर गुन्हेगारी रोखणार कशी? असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान याची कॉल रेकॉर्डिंग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असुन कारवाईची मागणी केली जात आहे.
सुरेश धस यांचीही ऑडिया क्लीप झाली होती व्हायरल!
धक्कादायक म्हणजे बीडमध्ये दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांचीही एक धमकी देणारी कथित ऑडियो क्लीप व्हायरल झाली होती. ज्यामध्ये आमदार सुरेश धस हे हातपाय मोडण्याची धमकी देत असल्याचे ऐकायला येते. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं सोशल मीडियाचं काम पाहत असल्याचा दावा करणाऱ्या एका तरुणाला आमदार सुरेश धस यांनी फोनवरून हात पाय मोडण्याची धमकी दिली होती. याची कथित कॉल रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
(टीप: टीव्ही9 मराठी या ऑडियो क्लीपची पुष्ठी करत नाही)
