घटस्फोटानंतर पोटगीमुळे कंगाल झालो.., कमल हासन यांच्या दाव्यावर पहिली पत्नी संतापली; म्हणाली, अत्यंत बालिश..
Kamal Haasan: कमल हासन यांनी एका मुलाखतीत दावा केला होता की त्यांच्या पहिल्या घटस्फोटानंतर द्याव्या लागलेल्या पोटगीमुळे ते कंगाल झाले होते. यावर त्यांची पूर्व पत्नी वाणी गणपती यांनी त्यांचं हे वक्तव्य पूर्णपणे मूर्खपणाचं आणि अत्यंत बालिश असल्याचं सांगत फेटाळलं होतं.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार कमल हासन हे त्यांच्या चित्रपटांइतकेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांच्या पहिल्या लग्नाची आणि घटस्फोटाची चर्चा सुरू झाली आहे. कमल हासन यांनी एका जुन्या मुलाखतीत पहिली पत्नी वाणी गणपती यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाल्याचा दावा केला होता. पोटगी आणि घटस्फोटाच्या आर्थिक समझोत्यामुळे आपली बँक बॅलन्स शून्यावर आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, त्यांच्या या विधानावर वाणी गणपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. कमल हासन यांचे हे दावे पूर्णपणे चुकीचे असल्याचं सांगत त्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. विशेष म्हणजे, मुलीची सहानुभूती मिळवण्यासाठी कमल यांनी अशी वक्तव्य केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
काय म्हणाले होते कमल हासन?
2015 मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत कमल हासन यांनी त्यांच्या पहिल्या घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल सांगितलं होतं. त्यावेळी ते अभिनेत्री सारिका यांच्यासोबतच्या नात्याबद्दल आणि मुलगी श्रुती हासनच्या जन्मानंतरच्या परिस्थितीबद्दल बोलत होते. कमल हासन यांच्या म्हणण्यानुसार, वाणी गणपती यांच्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर द्याव्या लागलेल्या पोटगीमुळे त्यांचे सर्व पैसे संपले होते. त्यांना शून्य बँक बॅलन्ससह नव्याने आयुष्य सुरू करावं लागलं होतं. यानंतर मुलगी श्रुतीसोबत त्यांना भाड्याच्या घरात राहावं लागलं. मात्र, त्यावेळी चित्रपट कारकीर्द चांगली सुरू असल्यामुळे ते आर्थिक संकटातून लवकर बाहेर पडू शकले, असंही त्यांनी सांगितलं होतं.
वाणी गणपती यांनी दिलं होतं सडेतोड उत्तर
कमल हासन यांच्या या विधानानंतर वाणी गणपती यांनी ‘इकॉनॉमिक टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावर टीका केली होती. घटस्फोटानंतर पोटगी द्यावी लागल्यामुळे एखादी व्यक्ती कंगाल होऊ शकते का? न्यायालय एवढी मोठी रक्कम देण्याचा आदेश देतं का की ज्यामुळे महिलेला आयुष्यभर आर्थिक सुरक्षितता मिळेल? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. कमल हासन यांनी घटस्फोटानंतर भाड्याच्या घरात राहावं लागल्याचं सांगितलं होतं. मात्र, वाणी यांच्या मते, लग्नाच्या संपूर्ण काळात ते दोघेही भाड्याच्या घरातच राहत होते. काही काळ ते कमल यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या घरातही राहिले होते. त्यामुळे घटस्फोटानंतर आलिशान घर सोडून भाड्याच्या घरात जावं लागल्याचं चित्र निर्माण करणं चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
‘मुलीची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न’
वाणी गणपती यांनी कमल हासन यांच्या विधानावर संताप व्यक्त करताना ते मुलगी श्रुती हासनची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं होतं. स्वतःला त्याग करणारे वडील म्हणून दाखवण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केल्याची टीकाही वाणी यांनी केली होती. त्यांचे हे वागणं अत्यंत बालिश असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर कमल हासन स्वतःच्या चुका कधीच मान्य करत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली होती. चित्रपट असो किंवा वैयक्तिक आयुष्य, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला जबाबदार धरण्याची त्यांची सवय असल्याचं वाणी यांनी म्हटलं होतं.
10 वर्षांचं वैवाहिक आयुष्य, नंतर वेगळे झाले मार्ग
कमल हासन आणि वाणी गणपती यांनी 1978 मध्ये लग्न केलं होतं. जवळपास दहा वर्षांच्या संसारानंतर 1988 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर कमल हासन यांनी अभिनेत्री सारिका यांच्याशी लग्न केलं. या दोघांना श्रुती आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत. 2004 मध्ये कमल आणि सारिका यांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर कमल हासन अभिनेत्री गौतमी यांच्यासोबत जवळपास 13 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. 2016 मध्ये त्यांचेही मार्ग वेगळे झाले.
