
कंगना राणौत यांच्या ‘क्वीन’ या चित्रपटात, तसंच ‘इश्कबाज’ या लोकप्रिय मालिकेत भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री नवनींद्र बहल यांचं निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवनींद्र यांचा मुलगा आणि निर्माता कानू बहल यांनी याबद्दलची माहिती दिली. सोशल मीडियावर पोस्ट लिहित त्यांनी शोक व्यक्त केला आहे. नवनींद्र यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘माझा विश्वास, प्रेम, मार्गदर्शक, गुरू, माझं हृदय.. तुझा प्रवास सुखरुप होवो आई’, अशी भावूक पोस्ट त्यांच्या मुलाने लिहिली आहे.
‘जोपर्यंत तू मला पुन्हा जन्म देत नाहीस, तोपर्यंत माझे डोळे तुझं गोड हास्य आणि जिज्ञासू नजरेचा शोध घेत राहतील. तू अशीच चमकत राहा’, अशा शब्दांत कानू बहल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करत इंडस्ट्रीतल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ‘ओम शांती.. 1995 पासून नवनींद्रजींसोबतच्या खूप आठवणी आहेत’, असं प्रसिद्ध गायिका रेखा भारद्वाज यांनी लिहिलं. तर निर्माती आरती कडव यांनी लिहिलं, ‘खूप दु:ख झालं. त्या खूप प्रेमळ आणि मायाळू होत्या. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप प्रभावी होतं.’
नवनींद्र बहल यांनी ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक ललित बहल यांच्याशी लग्न केलं होतं, ज्यांचं 2021 मध्ये कोविडदरम्यान दिल्लीत निधन झालं होतं. नवनींद्र यांनी वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून रंगमंचावर परफॉर्म करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी गुलजार दिग्दर्शित ‘माचिस’, दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘ओये लकी, लकी ओये’ आणि कंगना राणौत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘क्वीन’ चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. तसंच ‘द प्राइड’, ‘द गुरू’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्येही त्यांनी काम केलं होतं. नवनींद्र यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतही दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘दिल बोले ओबेरॉय’ आणि ‘इश्कबाज’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी नकुल मेहताच्या ऑनस्क्रीन आजीची भूमिका साकारली होती. त्यांनी ‘विजी’ आणि ‘सदा-ए-वादी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे.