‘कांतारा’च्या कमाईने मोडला ‘बाहुबली 2’चा विक्रम; आता KGF 2 च्या रेकॉर्डकडे वाटचाल

| Updated on: Nov 04, 2022 | 8:49 PM

रिलीजच्या पाचव्या आठवड्यातही 'कांतारा'ची दमदार कमाई; आकडे पाहून व्हाल थक्क!

कांताराच्या कमाईने मोडला बाहुबली 2चा विक्रम; आता KGF 2 च्या रेकॉर्डकडे वाटचाल
Kantara
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई- ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाला प्रदर्शित होऊन महिना उलटला तरी सोशल मीडियावर त्याचीच जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित करतोय. प्रदर्शनाच्या पाचव्या आठवड्यात ‘कांतारा’ने एस. एस. राजामौली यांच्या ‘बाहुबली 2’ला मागे टाकलं आहे. कांताराने पाचव्या आठवड्यात जवळपास 65 कोटींचा गल्ला जमवला आहे. ही कमाई चौथ्या आठवड्याच्या तुलनेत फक्त 10 टक्क्यांनी कमी आहे. बाहुबली 2 या चित्रपटाने पाचव्या आठवड्यात 40 कोटी रुपयांची कमाई केली होती.

कांताराची आतापर्यंतची कमाई ही जवळपास 275 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. सहाव्या आठवड्यात ही कमाई 300 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोन्नियिन सेल्वनला टाकू शकते मागे

प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाचं जोरदार कौतुक झालं. माऊथ पब्लिसिटीमुळे पाचव्या आठवड्यातही चित्रपटाची कमाई चांगली सुरू आहे. याच चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननेही चांगली कमाई केली आहे. कांताराची एकूण कमाई ही 350 कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं झाल्यास मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्वन- 1 या चित्रपटालाही ‘कांतारा’ मागे टाकू शकेल.

हे सुद्धा वाचा

कोणत्या आठवड्यात किती कमाई?

30 सप्टेंबर रोजी ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनीत कांतारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 26.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 37.25 कोटींची कमाई झाले. चौथ्या आठवड्यात कांताराने 70.75 कोटी रुपयांची तगडी कमाई केली. तर पाचव्या आठवड्याची कमाई 64.75 कोटी रुपये इतकी झाली. कांताराने आतापर्यंत एकूण 274.50 कोटी रुपये कमावले आहेत.

यशची मुख्य भूमिका असलेल्या केजीएफ- 2 या चित्रपटानंतर ‘कांतारा’ हा असा एकमेव चित्रपट आहे, ज्याने कर्नाटकमध्ये कमाईचा 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. कर्नाटकमध्ये केजीएफ 2 चा विक्रम मोडण्यासाठी कांताराला आणखी 22 कोटींच्या कमाईची गरज आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने फक्त तीन आठवड्यांत 59 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.