
कॉमेडियन समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या शोमध्ये प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादियाने आईवडिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून सध्या मोठा वाद सुरू आहे. अशातच कॉमेडियन कपिल शर्माचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला एकाच दिवसात तीस लाखांहून अधिक व्हूज मिळाले आहेत. कपिलच्या या व्हिडीओवरून आतापर्यंत वादा का झाला नाही, त्याच्याविरोधात कारवाई का झाली नाही, असा सवाल नेटकरी करत आहेत. हे नेमकं प्रकरण काय आहे आणि कपिल शर्माने या व्हिडीओ असं काय म्हटलंय, ते जाणून घेऊयात..
कपिलचा हा व्हिडीओ 2023 मधला आहे. त्यावेळी त्याच्या शोमध्ये सेलिब्रिटी क्रिकेट लीगचे स्टार्स पोहोचले होते. यामध्ये लाल यादव निरहुआ आणि मनोज तिवारी यांचा समावेश होता. शोच्या या एपिसोडमध्ये कपिलने म्हटलं होतं, “आपल्या देशात दोन गोष्टींबद्दल प्रचंड क्रेझ आहे. एक चित्रपटांची आणि दुसरी क्रिकेटची क्रेझ. बोर्डाच्या परीक्षेसाठी अभ्यास करण्यासाठी कधी पहाटे चार वाजता उठणार नाही. पण क्रिकेट बघण्यासाठी पहाटे चार वाजता उठून बसणार. काही लोक तर इतके शौकीन असतात की रात्री दोन वाजताच उठून क्रिकेट बघू लागतात. क्रिकेटचा मॅच चार वाजता सुरू होणार असतो आणि मग हे आईवडिलांची कबड्डी पाहून झोपून जातात. म्हणजे आईवडील भांडत असतात ना.”
कपिलच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आतापर्यंत कपिलविरोधात कारवाई का झाली नाही’, असा सवाल काहींनी केला. तर ‘आणि लोक म्हणतात की कपिलचा शो हा फॅमिली शो आहे’, असं दुसऱ्याने लिहिलं आहे. ‘मी कपिल शर्माचा खूप आदर करायचो, पण हासुद्धा तसाच निघाला’, असं तिसऱ्या युजरने म्हटलं आहे. ‘याने केलं तर कॉमेडी आणि समयने केलं तर वल्गॅरिटी’ अशी उपरोधिक टिप्पणीही नेटकऱ्यांनी केली आहे.
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्तींना परीक्षक म्हणून बोलावण्यात येतं. या शोच्या एका एपिसोडमध्ये युट्यूबर रणवीर अलाहबादिया आणि अपूर्वा मखिजा यांना बोलावण्यात आलं होतं. त्यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई-वडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारत आक्षेपार्ह विधानं केली होती. याप्रकरणी त्याच्या आणि शोमधील इतर परीक्षकांच्याही विरोधात एफआयआर दाखल झाली आहे. इंडियाज गॉट लेटेंटचे एकूण 18 भाग युट्यूबवर प्रसिद्ध झाले होते. हे सर्व भाग हटविण्याबाबत युट्यूबला पत्र पाठविण्यात आल्याचं सायबर विभागाने सांगितलंय.