माझ्याासाठी मरण सोपं..; मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाला बिपाशाचा पती

| Updated on: Feb 06, 2024 | 12:30 PM

अभिनेत्री बिपाशा बासूने 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. जन्मापासूनच बाळाच्या हृदयात दोन छिद्र असल्याचं निदान झालं होतं. करण सिंह ग्रोवर आणि बिपाशा बासूच्या मुलीवर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली होती. याविषयी करण पहिल्यांदाच मोकळेपणे व्यक्त झाला आहे.

माझ्याासाठी मरण सोपं..; मुलीच्या ओपन हार्ट सर्जरीबद्दल पहिल्यांदाच व्यक्त झाला बिपाशाचा पती
Karan Singh Grover, Bipasha Basu
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 6 फेब्रुवारी 2024 | अभिनेता करण सिंह ग्रोवरने ‘फायटर’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन केलंय. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत करण त्याच्या आयुष्यातील अत्यंत कठीण काळाबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. करणची पत्नी आणि अभिनेत्री बिपाशा बासूने 2022 मध्ये मुलीला जन्म दिला. त्यांनी त्यांच्या मुलीचं नाव ‘देवी’ असं ठेवलंय. मात्र गेल्याच वर्षी करण आणि बिपाशाने मुलीच्या आरोग्याविषयी धक्कादायक खुलासा केला होता. देवीच्या हृदयात जन्मापासूनच दोन छिद्र असल्याचं त्यांनी सांगितलं. यापुढे तिच्यावर ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली. नेमकं हे सगळं घडत असतानाच करणला ‘फायटर’तं शूटिंग पूर्ण करायचं होतं. त्यामुळे मुलीला सोडून कामावर जाणं खूप कठीण होतं, असं करणने सांगितलं.

‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, “सुरुवातीला प्रत्येक शूटिंग शेड्युलच्या वेळी मला असं वाटायचं की कामावर जाऊच नये. कारण ती परिस्थिती फार गंभीर होती आणि मुलीला सोडून जाणं खूप कठीण होतं. ती परिस्थिती मी योग्यप्रकारे हाताळली नाही. पण बिपाशामुळे मला त्यातून सावरण्याचं बळ मिळालं. त्यावेळी मुलीची अशी परिस्थिती पाहण्यापेक्षा मला माझा मृत्यू सोपा वाटत होता. एकदा रुग्णालयात जेव्हा आम्हाला देवीला डॉक्टरांकडे सोपवायचं होतं, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. मी तिला डॉक्टरांच्या हातात देऊच शकत नव्हतो. माझे हातपाय सुन्न झाले होते.”

हे सुद्धा वाचा

अशा परिस्थितीत पत्नी बिपाशाने खूप साथ दिल्याचं करणने यावेळी सांगितलं. “बिपाशा त्या संपूर्ण परिस्थितीदरम्यान जणू सिंहीणीसारखी वागली. ती प्रचंड शक्तीशाली महिला आहे. पण एका आईसाठीही तो क्षण अवघड होता. तिच्यामुळे मी हे सर्व सांभाळू शकलो. देवी जन्मापासून आतापर्यंत किंचितही बदलली नाही. तिला स्वभाव थोडा खोडकर आणि भरपूर प्रेमळ असा आहे. जेव्हा आम्ही तिला पहिल्यांदा आर्ट क्लासमध्ये घेऊन गेलो, तेव्हा तिने प्रत्येकाचा चेहरा रंगाने रंगवला होता”, अशा शब्दांत तो व्यक्त झाला.