प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने अभिनय सोडून स्वीकारला अध्यात्माचा मार्ग?

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण वाहीने अभिनयक्षेत्र सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्याची जोरदार चर्चा होत आहे. एका इन्स्टाग्रामवर पेजवर त्याच्या मुलाखतीमधील छोटा व्हिडीओ क्लिप शेअर करण्यात आला. त्यावरून या चर्चांना उधाण आलं आहे.

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याने अभिनय सोडून स्वीकारला अध्यात्माचा मार्ग?
करण वाही
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 24, 2026 | 10:39 AM

‘दिल मिल गए’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण वाही सध्या त्याच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करण त्याच्या अध्यात्मिक प्रवासाबद्दल आणि ट्रान्सफॉर्मेशनबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. मांसाहार सोडल्यामुळे आणि सात्विक जीवनशैली स्वीकारल्यामुळे त्याच्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल झाले, याविषयी त्याने सांगितलं. त्याच्या या मुलाखतीची छोटी क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि करणने अभिनयक्षेत्र सोडल्याची चर्चा सुरू झाली. अध्यात्माचा मार्ग स्वीकारल्यामुळे त्याने अभिनयापासून फारकत घेतल्याचं अनेकांनी म्हटलंय. त्यावर आता खुद्द करण वाहीनेच प्रतिक्रिया दिली आहे. अभिनयक्षेत्र सोडण्याबद्दल आणि अध्यात्मिक मार्ग स्वीकारण्याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिलं आहे.

करणने त्याच्या मुलाखतीची क्लिप इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. त्यावर त्याने लिहिलं, ‘अध्यात्मिक होणं म्हणजे याचा अर्थ असा नाही की मला माझं काम सोडावं लागेल. कृपया फक्त व्हायरल होण्यासाठी अशा अफवा पसरवू नका. मी त्या व्यक्तीला विनंती करतो की त्याने ही पोस्ट काढून टाकावी आणि खोटी बातमी पसरवू नये.’ या पोस्टद्वारे करणने स्पष्ट केलं आहे की यापुढेही तो मनोरंजन क्षेत्रात काम करत राहणार आहे.

पारस छाबडाच्या पॉडकास्ट मुलाखतीत करण त्याच्या लाइफस्टाइलमधील बदलांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला होता. “गेल्या काही महिन्यांपासून मी नामजपचा अभ्यास करतोय. वृंदावनमधून आणलेली तुळशीची माळा मी गळ्यात घालतोय. गेल्या तीन महिन्यांपासून मी मांसाहार पूर्णपणे सोडून दिला आहे. नीम करोली बाबा आणि प्रेमानंद महाराज यांसारख्या अध्यात्मिक गुरूंच्या शिकवणींचा माझ्यावर खूप परिणाम झाला आहे. मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की मी शाकाहारी बनेन. परंतु आता तुळशीची माळ घातल्यानंतर सर्वकाही शांतिपूर्ण वाटू लागलंय.”

या मुलाखतीत करण वाहीने अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबतच्या अफेअरच्या चर्चांवरही प्रतिक्रिया दिली. “आमच्या अफेअरच्या आणि लग्नाच्या चर्चा पूर्णपणे खोट्या आहेत. आम्ही एकत्र काम केलंय आणि आमच्यात चांगली मैत्री आहे. परंतु जेनिफरसोबत माझं रोमँटिक नातं अजिबात नाही. ती फक्त माझी चांगली मैत्रीण आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.

करणने ‘रिमिक्स’, ‘दिल मिल गए’, ‘बात हमारी पक्की है’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय त्याने सूत्रसंचालक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या शोजमध्येही त्याने भाग घेतला होता.

Follow Us