
अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान ही बॉलिवूडमधील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. करीनाशी लग्न करण्यापूर्वी सैफचं अभिनेत्री अमृता सिंहशी लग्न झालं होतं. तर करीना ही अभिनेता शाहिद कपूरला डेट करत होती. सैफचा घटस्फोट आणि करीनाचा ब्रेकअप झाल्यानंतर 2008 मध्ये ‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. विविध मुलाखतींमध्ये सैफ आणि करीना त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. आता त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी करीनाला ट्रोल करत आहेत. कारण यामध्ये करीना ही सर्वांसमोर सैफकडे दुर्लक्ष करताना दिसून येतेय. ते पाहून इतका कसला ॲटिट्यूड आहे, असा सवाल नेटकरी करीनाला करत आहेत.
करीना आणि सैफच्या या व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. एका पुरस्कार सोहळ्यातील हा जुना व्हिडीओ आहे. ज्यामध्ये करीना पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर येते. मंचावर सैफ अली खानसोबतच अक्षय खन्ना आणि परमेश्वर गोदरेज उभे असतात. पुरस्कारासाठी करीनाच्या नावाची घोषणा होताच ती मंचावर येते. त्यानंतर ती अक्षय खन्ना आणि परमेश्वर गोदरेज यांना मिठी मारते. परंतु त्यांच्याच बाजूला उभ्या असलेल्या सैफकडे स्पष्टपणे दुर्लक्ष करते. यानंतर करीना पुरस्कार स्वीकारून माइकजवळ आभार मानण्यासाठी जाते. हा व्हिडीओ पाहून चाहते चकीत झाले असून एकमेकांच्या प्रेमात पडण्यापूर्वी करीना सैफशी कसं वागली, यावरून विविध प्रतिक्रिया येत आहेत. भूतकाळातील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता वर्तमानकाळात कशा पद्धतीने गोष्टी बदलल्या आहेत, हे पाहून गंमतच वाटते, असं मत काहींनी व्यक्त केलंय.
‘सैफने ही गोष्ट खूपच गंभीरपणे घेतली’, असं एकाने म्हटलंय. तर ‘सैफ म्हणाला असेल, आता ही माझी पत्नीच बनणार’, अशी गंमत दुसऱ्या युजरने केली. ‘कदाचित मीसुद्धा माझ्या भावी पतीला अशा प्रकारे कुठे ना कुठे तरी दुर्लक्ष करत असणार’, असं एका नेटकऱ्याने लिहिलं आहे. सैफ आणि करीनाने 16 ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न केलं. या दोघांना तैमुर आणि जहांगिर अशी दोन मुलं आहेत.