
नवीन वर्षाचं स्वागत करताना अनेकांनी 2025 या सरत्या वर्षाच्या आठवणींना उजाळा दिला. हे वर्ष कसं केलं आणि त्यातून काय शिकायला मिळालं, याविषयी अभिनेत्री करीना कपूरने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. पती सैफ अली खानसोबतचा फोटो पोस्ट करत तिने 2025 हे वर्ष त्यांच्यासाठी कठीण गेल्याचं सांगितलं. कारण 16 जानेवारी 2025 रोजी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरात घुसून सैफवर चाकूने हल्ला केला होता. त्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली. करीनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘आपण वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पोहोचलो आहोत, याचा आम्ही इथे बसून विचार करतोय. आम्ही इथपर्यंतचा प्रवास केला आहे. 2025 हे वर्ष आमच्यासाठी, आमच्या मुलांसाठी आणि कुटुंबीयांसाठी एक कठीण वर्ष होतं. परंतु आम्ही ते ताठ मानेनं, हसत आणि एकमेकांना साथ देत पार केलं. आम्ही खूप रडलो, प्रार्थना केली आणि आता अखेर इथवर पोहोचलो आहोत. 2025 ने आम्हाला शिकवलं की माणसाचा स्वभाव हा निर्भय असतो, प्रेम सर्व गोष्टींवर विजय मिळवते आणि मुलं आपल्या कल्पनापेक्षा जास्त धाडसी असतात. आम्ही आमच्या चाहत्यांचे, मित्रांचे आणि आमच्या पाठिशी उभ्या राहिलेल्या, आम्हाला सतत पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे सर्वशक्तिमान असलेल्या देवाचे आभार मानू इच्छिते. आम्ही आमच्या मनात नवीन उत्साह, अपार कृतज्ञता आणि सकारात्मकता घेऊन आणि आम्ही जे सर्वोत्तम करतो त्याबद्दलच्या आवडीने म्हणजेच चित्रपटांबद्दलच्या प्रेमाने 2026 मध्ये प्रवेश करतोय. मी नेहमीच म्हणते ‘चार दी काला”, अशी पोस्ट लिहित करीनाने सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देईल.
‘चार दी कला’ ही शीख धर्माशी संबंधित एक पंजाबी वाक्य आहे. याचा अर्थ शाश्वत आशावाद, उत्साह आणि सकारात्मकतेची मानसिक स्थिती कायम ठेवणं. 2025 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात मुंबईतील वांद्रे इथल्या घरात शिरून चोराने सैफवर हल्ला केला होता. सैफने त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी चोराच्या दिशेने धाव घेतली तेव्हा चोराने सैफवर थेट चाकूहल्ला केला होता. या झटापटीत सैफच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर जवळपास आठवडाभर रुग्णालयात उपचार घेऊन तो घरी परतला होता.