सैफ अली खानवरील चाकूहल्ला होता ‘फेक’? अभिनेत्याने सांगितलं पूर्ण सत्य
Saif Ali Khan : जानेवारी महिन्यात सैफवर त्याच्याच घरात एका चोराने चाकूहल्ला केला होता. चोराने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार खोलवर होते. त्यासाठी सर्जरी करावी लागली होती. परंतु हा हल्ला फेक होता, अशा चर्चांना अचानक उधाण आलं होतं.

अभिनेता सैफ अली खानवर या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी महिन्यात मुंबईतील वांद्रे इथल्या घरात शिरून चोराने हल्ला केला होता. सैफने त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी चोराच्या दिशेने धाव घेतली तेव्हा चोराने सैफवर थेट चाकूहल्ला केला होता. या झटापटीत सैफच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर जवळपास आठवडाभर रुग्णालयात उपचार घेऊन तो घरी परतला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ जेव्हा माध्यमांसमोर, पापाराझींसमोर आणि फोटोग्राफर्ससमोर आला, तेव्हा अनेकांनी प्रश्न उपस्थित केला. सहा वार होऊन आणि सर्जरी होऊनही सैफ इतक्या लवकर बरा कसा झाला, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला. त्यावरून काहींनी सैफवर झालेल्या चाकूहल्ल्याला ‘फेक’सुद्धा म्हटलं होतं. या आरोपांवर आता सैफने मौन सोडलं आहे.
‘टू मच विद काजोल अँड ट्विंकल’ या शोमध्ये सैफ म्हणाला, “मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताना काही लोकं तिथे जमली होती. अनेकांनी मला विविध सल्ले दिले. मीडिया खूप उत्सुक आहे.. असं ते म्हणत होते. माझं तिथे कोणीच काही ऐकत नव्हतं. मी त्यांना म्हटलं की, जर मीडिया उत्सुक असेल तर आपण हे सर्व शांतपणे हाताळलं पाहिजे. मी रुग्णालयाबाहेर चालत जाऊ शकतो. माझ्या पाठीवर टाके लागले होते आणि एक आठवडाभर मी रुग्णालयात होतो. माझी पाठ बरी होती, परंतु चालताना थोडं दुखत होतं. परंतु मी चालू शकत होतो. मला व्हीलचेअरची गरज नव्हती.”
“एकाने म्हटलं, अॅम्ब्युलन्समधून नेलं पाहिजे, तर दुसऱ्याने सल्ला दिला की व्हीचचेअरवरून गेलं पाहिजे. परंतु माझं मन मला सांगत होतं की, कुटुंबीय, चाहते, शुभचिंतक किंवा इतर कोणालाही काळजीचं कारण का द्यावं? फक्त बाहेर चालत जाऊन एका फोटोद्वारे मी संदेश देऊ शकतो की, माझी प्रकृती आता ठीक आहे, मी ठीक आहे. मला बाकीचा ड्रामा नको होता. पण त्यावर इतक्या प्रतिक्रियांचा भडीमार झाला, की हे खोटं आहे, बनावट आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.
16 जानेवारी रोजी मध्यरात्री 2 वाजता एक चोर सैफच्या घरात शिरला होता. त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत चोराने सैफवर चाकूने सहा वार केले. त्यापैकी दोन वार खोलवर झाले होते. यानंतर सैफवर न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफच्या मणक्याजवळ अडीच इंचाचा चाकूचा तुकडा रुतला होता, तोही काढल्याची माहिती डॉक्टरांनी दिली होती.
