
अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती संजय कपूरचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. पोलो खेळताना चुकून मधमाशी गिळल्याने त्याला श्वास घेण्यास अडचण निर्माण झाली आणि त्यामुळेच त्याला हृदयविकाराचा झटका आला, असं म्हटलं गेलं. संजय आणि करिश्माचं वैवाहिक आयुष्य अनेक कारणांमुळे चर्चेत आलं होतं. घटस्फोटादरम्यान करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबीयांवर बरेच आरोप केले होते. तर संजयने 2005 मध्ये करिश्माविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. तेव्हापासूनच दोघांचं खासगी आयुष्य चव्हाट्यावर आलं होतं. या याचिकेत करिश्माला मुलगी समायराला संजयच्या माहितीशिवाय देशाबाहेर घेऊन जाण्यास नकार देण्यात आला होता. संजयने करिश्मावर आरोप केला होता की समायराच्या नावावर पासपोर्ट जारी करताना सर्व कायदेशीर बाबींचं उल्लंघन करण्यात आलं होतं. त्यावरून कोर्टाने RPO ला नोटीस बजावली होती. तेव्हा करिश्माने पहिल्यांदाच तिच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांबद्दल व्यक्त झाली होती.
“या मुद्द्यावर मी पहिल्यांदाच बोलतेय. मी सध्या फार काही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीये. माझी मुलगी समायरा फक्त चार महिन्यांची आहे आणि तिच्यासाठी माझ्या मनात खूप भीती आहे. अर्थातच समायरा कोणत्या गोष्टी समजू शकत नाही. या सगळ्या गोष्टींनी मी प्रभावित होऊ नये याचा पूर्ण प्रयत्न करतेय. माझ्यासाठी ही खूप कठीण वेळ आहे. मला माझा वेळ हवा आहे. मी माझ्या मुलीबद्दलही खूप सजग आहे की तिच्यावर या गोष्टींचा परिणाम होऊ नये. जेव्हा ती मोठी होईल, तेव्हा मला विश्वास आहे की देव तिची काळजी घेईल”, असं करिश्मा म्हणाली होती.
करिश्मा आणि संजय यांचा घटस्फोट 2016 मध्ये झाला होता. त्यावेळी पोटगी म्हणून करिश्माला 70 कोटी रुपये आणि सासऱ्यांचं वडिलोपार्जित घर मिळालं होतं, असं म्हटलं जातं. तर संजयने मुलगी समायरा आणि मुलगा कियान यांच्यासाठी 14 कोटी रुपयांचे बाँड खरेदी केले होते. संजयचं 12 जून 2025 रोजी निधन झालं. नवी दिल्लीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी करिश्मा तिच्या दोन्ही मुलांना घेऊन अंत्यविधीला पोहोचली होती.