Govinda: असं नातं मी याआधी कधीच..; गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडवर भडकली सून कश्मीरा, सुनीताला म्हणाली..
Govinda: कोमल राणी स्वर्णकारने गोविंदाच्या वैवाहिक आयुष्यावरून टिप्पणी केल्यानंतर आता अभिनेत्री कश्मीरा शाहने सोशल मीडियावर पोस्ट लिहित सुनीता अहुजाला पाठिंबा दिला आहे. कश्मीराची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार यांच्यातील कथित जवळिकीच्या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरला आहे. गणेशोत्सवादरम्यान दोघं मुंबईतील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर गोविंदाचा भाचा आणि अभिनेता कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली. तिने कोणाचंही नाव घेतलेलं नसलं, तरी तिच्या पोस्टचा संदर्भ गोविंदा-कोमल राणी प्रकरणाशी जोडला जात आहे.
कश्मीरा शाहची पोस्ट-
‘माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या 30 वर्षांच्या प्रवासात मी जवळपास 50 चित्रपट केले आहेत. पण आजपर्यंत माझ्या एकाही सहकलाकाराला माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा माझ्या भावनांबद्दल काहीही माहिती नव्हती. मी माझ्या मनातलं सगळं फक्त त्या व्यक्तीलाच सांगितलं, ज्याच्याशी मी लग्न केलं तो म्हणजे कृष्णा. कामाच्या ठिकाणी एखाद्या सहकाऱ्याला दुसऱ्या व्यक्तीच्या इतक्या वैयक्तिक आणि खासगी आयुष्याबद्दल इतकी माहिती असते, असं नातं मी याआधी कधीच ऐकलं नाही,’ असं तिने लिहिलं आहे.
पुढे तिने म्हटलंय, ‘मला माहीत आहे की मी एक खंबीर महिला आहे आणि मीही खंबीर महिलांच्या कुटुंबात लग्न करून आले आहे. आपल्या कुटुंबाची काळजी घेतो म्हणून आम्हाला अनेकदा ‘उद्धट’, ‘अविचारी’, ‘हुकूमशाही वृत्तीच्या’, ‘ध्येयवादी’ आणि ‘स्वार्थी’ अशी विशेषणं लावली जातात. पण यावेळी पहिल्यांदाच आम्हाला ‘खुनी’ म्हटलं जात आहे. म्हणून जर प्रत्येक आई, पत्नी, बहीण, आत्या आणि अगदी त्यांच्या कुत्र्यांनाही, त्यांना प्रिय असलेल्या एका पुरुषाचं – मग तो वडील असो, पती असो, भाऊ असो किंवा तो कुत्रा असो, संरक्षण केल्याबद्दल ‘खुनी’ म्हटलं जात असेल, तर तसंच का होईना. तुम्ही अशाच खंबीर महिला आहात याचा मला अभिमान आहे, सुनिता.., आणि मी नेहमीच तुमच्या पाठीशी उभी राहीन.’
पहा पोस्ट-
गोविंदा आणि कोमल राणी यांना लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी एकत्र पाहिल्यानंतर या चर्चांना उधाण आलं. गोविंदाने मात्र या भेटीबाबत स्पष्टीकरण देताना ती आपल्या आगामी ‘रुपा’ या चित्रपटासाठी आशीर्वाद घेण्यासाठी असल्याचं सांगितलं. यापूर्वीही करिश्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यासोबत मंदिरात गेल्याचा उल्लेख त्याने केला. कोमल राणीसोबतचं नातं व्यावसायिक असल्याचंही गोविंदाने स्पष्ट केलं.
या संपूर्ण प्रकरणात गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने केलेल्या वक्तव्यांचीही चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी कोलकात्यातील दक्षिणेश्वर काली मंदिरात दर्शन घेतल्यानंतर सुनीताने तिच्या आयुष्यातील काही समस्यांचा उल्लेख केला होता. तिने महिला आणि जेन-झींकडून समर्थन मागितलं आणि तिचं कुटुंबीय आयुष्य अडचणीत असल्याचं म्हटलं. यानंतर कोमल राणी स्वर्णकारनेही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. आधीच अडचणीत असलेल्या घराला तोडणारी व्यक्ती म्हणून आपल्याकडे पाहणं योग्य नसल्याचा दावा तिने केला. सुनीता यांच्या वक्तव्यांचा अप्रत्यक्ष संदर्भ देत तिने आपल्याला या वादात ओढू नये, असंही म्हटलं.
विशेष म्हणजे गोविंदानेही या संपूर्ण चर्चेमागे आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे गोविंदा-सुनीता-कोमल राणी आणि कश्मीरा शाह यांच्या वक्तव्यांमुळे हे प्रकरण सध्या पुन्हा चर्चेत आलं आहे.