“माझे शब्द संपले,विकी तू…”; सुंदर साडी नेसून ‘छावा’ पाहायला आलेल्या कतरिनाकडून नवर्‍याचं तोंडभरून कौतुक

अभिनेता विकी कौशलच्या "छावा" चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनार राज्य केलं आहे. पहिल्याच दिवशी 'छावा'चा हाऊसफूल शो पाहायला मिळाला तसेच प्रेक्षक तर निःशब्द झाले आहेत. दरम्यान कतरिना कैफनेही चित्रपटाचे आणि विकीच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केलं आहे. कतरिनाने चित्रपट आणि नवरा विकीसाठी कौतुकाची भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

माझे शब्द संपले,विकी तू...; सुंदर साडी नेसून छावा पाहायला आलेल्या कतरिनाकडून नवर्‍याचं तोंडभरून कौतुक
| Updated on: Feb 15, 2025 | 12:58 PM

14 फेब्रुवारी 2025 हा व्हॅलेंटाईनमुळे कमी आणि विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटामुळे जास्त लक्षात राहिला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची मने जिंकली. काही प्रेक्षक तर दुसऱ्यांदा हा चित्रपट पाहायला जाणार असल्याच्या कमेंट्स करत आहेत. जवळपास सर्वच थिएटर काल हाऊसफूल होते आणि सर्व थिएटच्या स्क्रिन या फक्त छावा चित्रपटाच्या आवाजाने घुमत होत्या.

प्रेक्षक अक्षरश: निःशब्द झाले

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर पाहाताना प्रेक्षक अक्षरश: निःशब्द झाले होते. याच श्रेय जातं ते दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि मुख्य म्हणजे विकी कौशलला. विकी कौशलचे सगळीकडे फक्त कौतुक आणि कौतुकच सुरु आहे.

विकीने यासाठी घेतलेली मेहनत सर्वांनाच माहित आहे. संभाजी महाराजांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारनं ही एक मोठी जबाबदारी त्याच्यावर होती. पण त्याचं कौतुक आणि चित्रपटासाठी मिळणारा प्रतिसाद पाहाता त्याने ती उत्तमरित्या पेलली आहे यावर नक्कीच विश्वास बसतो.

विकीचं बायकोकडून कौतुक

विकीचं कौतुक फक्त प्रेक्षकांनीच नाही तर त्याची लाडकी बायको कतरिना कैफनेही केलं आहे. प्रदर्शनाच्या एक दिवस आधी ‘छावा’चा प्रीमियर शो पार पडला. या सोहळ्याला कतरिना कैफही आली होती. प्रीमियरवेळी कतरिना सुंदर साडी नेसून या सोहळ्याला हजर राहिली होती. नवऱ्याचा ‘छावा’ सिनेमा पाहून कतरिना नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. अखेर तिने याबाबत इन्स्टाग्राम भलीमोठी पोस्ट शेअर करत आपल्या नवऱ्याचं, चित्रपटाचं,लक्ष्मण उतेकर तसेच संपूर्ण टीमचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

पोस्टमध्ये कतरिनाने काय म्हटलं?

कतरिनाने पोस्टमध्ये म्हटलं आहे, “किती सुंदर सिनेमॅटिक अनुभव होता… छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा अतिशय सुंदर पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. लक्ष्मण उतेकर तुम्ही खऱ्या अर्थाने कमाल केलीत. मी सिनेमा पाहून थक्क झाले. चित्रपटाची शेवटची 40 मिनिटे… त्या क्षणाला मी खरंच नि:शब्द झाले, माझे शब्द संपले. काल रात्री हा सिनेमा मी पाहिला आणि आज सकाळी उठल्यापासून पुन्हा एकदा मी ‘छावा’ केव्हा पाहणार असं मला झालंय… या चित्रपटाचा माझ्यावर खूप प्रभाव पडलाय जो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही.” असं म्हणत तिने चित्रपट पाहिल्यानंतरचा तिचा अनुभव सांगितला.

“विकी … तू सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट आहेस..”

पुढे कतरिना नवऱ्याचं कौतुक करताना म्हणाली, “विकी कौशल… तू सर्वार्थाने सर्वोत्कृष्ट आहेस. तू जेव्हा मोठ्या पडद्यावर येतोस तेव्हा काहीतरी वेगळं घेऊन येतोस. प्रत्येक शॉट, तू पडद्यावर आणलेली ऊर्जा आणि सिनेमातल्या त्या मूळ पात्रांमध्ये तू कसा सहज रुपांतरीत होतोस… हे पाहून खूपच छान वाटतं. तुझ्या प्रतिभेचा खूप अभिमान आहे. दिनेश विजन काय सांगू मी? तुम्ही खरंच खूप दूरदर्शी आहात. तुम्ही ज्या गोष्टीवर विश्वास ठेवता त्याचं सोनं करता. सिनेमातल्या सगळ्याच कलाकारांनी अतिशय सुंदर काम केलं आहे. हा सिनेमा रुपेरी पडद्यासाठीच बनवला गेलाय… संपूर्ण टीमचा मला खूप अभिमान आहे. #छावा”

विकीनंतर अक्षय खन्नाचंही प्रेक्षकांकडून कौतुक

दरम्यान, ‘छावा’ मध्ये विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री रश्मिकाने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. याशिवाय औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. विकीनंतर भूमिकेसाठी, अभियनयासाठी कोणाचं कौतुक होत असेल तर ते अक्षय खन्नाचं. त्यानेही त्याच्या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत ही नक्कीच पडद्यावर दिसतेय.

प्रत्येकाने पाहावा असा चित्रपट

दरम्यान या चित्रपटात मराठी अभिनेता संतोष जुवेकर त्यानंतर आशुतोष राणा, विनीत सिंह, दिव्या दत्ता, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी अशी दमदार स्टारकास्टही आहे.यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. एकंदरितच छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट प्रत्येकाच्या मनावर कायमची छाप सोडणार यात वाद नाही आणि प्रत्येकजण छत्रपती शिवराय अन् छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केल्याशिवाय राहणार नाही.