KBC 17 : पहिल्याच आठवड्यात भेटला सिझनचा पहिला करोडपती; 7 कोटींकडे सर्वांचं लक्ष

आपल्या ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा 'कौन बनेगा करोडपती' हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या नव्या सिझनच्या पहिल्याच आठवड्यात पहिला करोडपती भेटला आहे. आता सात कोटी रुपयांच्या प्रश्नांकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

KBC 17 : पहिल्याच आठवड्यात भेटला सिझनचा पहिला करोडपती; 7 कोटींकडे सर्वांचं लक्ष
आदित्य कुमार आणि अमिताभ बच्चन
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 19, 2025 | 9:52 AM

अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय ‘कौन बनेगा करोडपती’ या शोचा 17 वा सिझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 11 ऑगस्टपासून हा नवा सिझन सुरू झाला असून पहिल्याच आठवड्यात काही असे क्षण प्रेक्षकांना पहायला मिळाले, ज्यामुळे उत्सुकता आणखी वाढली आहे. या सिझनची खास बात म्हणजे अगदी पहिल्याच आठवड्यात पहिला करोडपती भेटला आहे. या एपिसोडचा प्रोमो चॅनलच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. उत्तराखंडचे आदित्य कुमार यांनी एक कोटी रुपये जिंकले आहेत. आदित्य हे या सिझनचे पहिलेच करोडपती आहेत. विशेष म्हणजे ते 7 कोटी रुपयांच्या जॅकपॉट प्रश्नाचं उत्तर देण्याचाही प्रयत्न करणार आहेत. परंतु ते 7 कोटी रुपये जिंकू शकणार की नाहीत, हे एपिसोड प्रसारित झाल्यावरच समजू शकेल. परंतु या शोचा नवीन प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

या शोच्या प्रोमोमध्ये हॉटसीटवर बसलेले आदित्य हे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा मारताना दिसून येत आहेत. ते त्यांच्या कॉलेजच्या आठवणी बिग बींना सांगत असतात. “कॉलेजमध्ये असताना मी एकदा माझ्या सर्व मित्रांना सांगितलं होतं की माझी निवड केबीसीसाठी झाली आहे. संपूर्ण आठवडाभर मी त्याबद्दल मित्रांना खोटं सांगत होतो. इतकंच नव्हे तर केबीसीची टीम एका आठवड्यात व्हिडीओ शूट करण्यासाठी येईल, तेव्हा सर्वजण तयारीत राहा, असंही त्यांना सांगितलं होतं. ते ऐकून एकाने नवीन पँट घेतली, तर दुसऱ्याने नवीन शर्ट घेतला. एका आठवड्यानंतर जेव्हा त्यांनी मला केबीसीच्या शूटिंगबद्दल विचारलं, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी मस्करी करत होतो. त्यामुळे यावेळी जेव्हा खरंच मला केबीसीतून कॉल आला आणि मी त्याविषयी मित्रांना सांगितलं, तेव्हा त्यांना विश्वासच बसत नव्हता. जेव्हा मी त्यांनी मेसेज दाखवला, तेव्हा त्यांना खरं वाटलं.” हा किस्सा ऐकून बिग बी त्यांना म्हणतात, “तुम्ही खूप वरपर्यंत पोहोचलेले आहात (हसतात).”

मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये की मी केबीसीमध्ये आलोय आणि एक कोटी रुपये जिंकले आहेत, अशा शब्दांत आदित्य व्यक्त होतात. त्यावर बिग बी त्यांना म्हणतात, “तुम्ही आणखी वरपर्यंत पोहोचाल, सात कोटी रुपयांपर्यंत.” त्यानंतर आदित्य सात कोटी रुपयांचा प्रश्न ऐकण्यासाठी सज्ज होतात. यापुढे काय होणार, हे शोच्या आगामी एपिसोडमध्येच पहायला मिळेल.