Anirudha Ravichander: काव्या मारनच्या होणाऱ्या नवऱ्याची एक्स गर्लफ्रेंड; लिपलॉकचे फोटो झाले होते लीक, अनिरुद्धने मागितलेली जाहीर माफी
Anirudha Ravichander: काव्या मारनशी लग्न करणाऱ्या अनिरुद्ध रविचंदरचं खासगी आयुष्य सध्या चर्चेत आलं आहे. काव्याला डेट करण्याच्या आधी अनिरुद्धचं नाव एका प्रसिद्ध गायिकेशी जोडलं गेलं होतं.

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि सनरायझर्स हैदराबादची सहमालक काव्या मारन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच अनिरुद्धच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी चर्चेत आल्या आहेत. काव्या मारनच्या आधी अनिरुद्धचं नाव अभिनेत्री आणि गायिका अँड्रिया जेरेमियाशी जोडलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर काही वर्षांपूर्वी या दोघांचे प्रायव्हेट फोटो इंटरनेटवर लीक झाल्यानंतर मोठी चर्चा झाली होती.
अँड्रिया जेरेमिया ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री, पार्श्वगायिका आणि संगीतकार आहे. अभिनयासोबतच गायन आणि संगीत क्षेत्रातही तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी तिने गायिका आणि रंगभूमीवरील कलाकार म्हणून काम केलं.
अँड्रियाने 2005 मध्ये पार्श्वगायनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं. ‘अन्नियन’ चित्रपटातील ‘कन्नुम कन्नुम नोकिया’ या गाण्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अभिनयाकडेही मोर्चा वळवला. 2007 मध्ये ‘पच्चैकिली मुथुचरम’ या चित्रपटातून तिने अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. अनिरुद्ध रविचंदर आणि अँड्रिया यांच्या नात्याची चर्चा 2012 मध्ये मोठ्या प्रमाणात झाली होती.
त्यावेळी अनिरुद्ध ‘व्हाय दिस कोलावेरी डी’ या गाण्यामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. त्याच काळात दोघांचे लिपलॉकचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले. या घटनेमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या.
अँड्रियाने त्यावेळी हे फोटो जुने असल्याचं सांगितलं होतं. तसंच, दोघांमध्ये सुंदर नातं होतं; मात्र काही कारणांमुळे त्यांना वेगळं व्हावं लागलं, अशी भूमिका तिने मांडली होती. तिच्या म्हणण्यानुसार, फोटो सार्वजनिक होण्यापूर्वीच त्यांचं नातं संपलं होतं.
या प्रकरणानंतर अनिरुद्धने एका मुलाखतीत अँड्रियाची माफी मागितली होती. त्याने तिच्या सहवासाबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली होती. 2019 मध्ये अँड्रियाने आपल्या पूर्वीच्या नात्याबद्दल झालेल्या चर्चेचा तिच्यावर भावनिक परिणाम झाल्याचं सांगितलं होतं. वैयक्तिक अनुभव सार्वजनिक चर्चेचा विषय बनल्यामुळे तिला कठीण काळातून जावं लागलं, असं तिने एका मुलाखतीत नमूद केलं होतं.