Vaibhav Sooryavanshi : KBC मध्ये वैभव सूर्यवंशीचा तो प्रश्न अन् आमिर खान, सनी देओल झाले निरुत्तर

कौन बनेगा करोडपतीचा १८ वा सीझन आमिर, प्रीती आणि सनी देओल यांच्या उपस्थितीत सुरू झाला. १ लाख रुपयांच्या एका क्रिकेट प्रश्नाने या तिन्ही स्टार्सना अवाक् केले.

Vaibhav Sooryavanshi : KBC मध्ये वैभव सूर्यवंशीचा तो प्रश्न अन् आमिर खान, सनी देओल झाले निरुत्तर
वैभव सूर्यवंशीचा तो प्रश्न आणि निरुत्तर झाले आमिर- सनी देओल
| Updated on: Aug 11, 2026 | 10:16 AM

‘कौन बनेगा करोडपती..’ महानायकाचा धीरगंभीर आवाज, मोजक्या पण उत्तम शब्दांत केलेलं निवदेन, प्रेक्षकांना बोलतं करण्याची, त्यांना आपलसं करण्याची हातोटी आणि कधीकधी मेंदूचा कस लागतील असे प्रश्न… या सगळ्या कॉम्बिनेशनमुळे उत्तम जमून आलेला हा खेळ. म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षक आतुरतेने या शोची वाट पहात असतात. नुकतीच ( सोमवार, 10 ऑगस्ट) KBC ला पुन्हा सुरूवात झाली असून यंदा या शोचा 18 वा सीझन घेऊन अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) पुन्हा आले आहेत.

‘बंटवारा 1947’ या चित्रपटाच्या स्टारकास्टने यंदा या शोचा शुभारंभ झाला. आमिर खान, प्रीती झिंटा आणि सनी देओल यांच्या उपस्थितीने शोला चार चाँद लागले.  मात्र याच शोमध्ये भाव खाऊन गेला तो उदयोन्मुख क्रिकेटर वैभव सूर्यवंशी. तो काही या शोमध्ये आला नव्हता, पण त्याच्याशी रिलेटेड एका प्रश्नाने या स्टार्सची बोलती बंद झाली. 1 लाखांसाठी विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर ना आमिरला माहीत होतं ,ना सनी देओलला. अखेर अभिनेत्री आणि आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाची को-ओनर प्रीति झिंटाने याचं उत्तरं दिलं, पण ते बरोबर होतं का ?,  काय होता तो सवाल?, चला जाणून घेऊया.

काय होता प्रश्न ?

केबीसीचे होस्ट असलेले अमिताभ बच्चन यांनी आमिर, प्रीती आणि सनी देओल यांना 1 लाख रुपयांसाठी एक प्रश्न विचारला. इंडियन प्रीमिअर लीग 2026 मध्ये ऑरेंज कॅप कोणी जिंकली ? असा तो सवाल होता. त्यानंतर समोरच्या स्क्रीनवर पर्पल कॅपसाठी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याचा फोटो आला. पुढे विचारण्यात आलं की ऑरेंज कॅपच्या समोर कोणत्या खेळाडूचा फोटो येईल ? केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी, असे चार पर्याय त्यांना देण्यात आले.

मला वाटतं वैभव सूर्यवंशी

तो प्रश्न  ऐकून आमिर खान विचारात पडला. नंतर तो प्रीती झिंटाच्या दिशेने वळला आणि म्हणाला, ‘ यार, हा तर क्रिकेटशी निगडीत प्रश्न आहेत, याचं उत्तर तर तुलाच माहीत असेल.’  त्यानंतर सनी देओल म्हणाला,’ मला तर क्रिकेटबद्दल काहीच माहीत नाही.’ मग अमिताभ बच्चन यांनी पुन्हा सवाल विचारत चारही ऑप्शन्स ऐकवले. पुढे ते प्रीती झिंटाला म्हणाले,  ‘प्रीती तुम्ही तर ( आयपीएल संघाच्या) मालक आहात.’  त्यावर प्रीतीनेही हजरजबाबीपणे उत्तर दिलं, ‘सर पण आम्ही जिंकलो नाही ना..’   पुढे प्रश्नाचा विचार करत ती म्हणाली याचं उत्तर यशस्वी जयस्वाल तर नाहीये, ते ऐकून आमिर म्हणाला, ‘मग केएल राहुल?’ मात्र प्रीती पुढे म्हणाली, ‘नाही, नाही, मला वाटतं योग्य उत्तर आहे वैभव सूर्यवंशी’

आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा बोलबाला

प्रीती झिंटाने हे उत्तर सांगून ते लॉक करायला लावलं आणि तेच उत्तर बरोबर निघालं. उत्तर ऐकताच टाळ्याचा कडकडाट झाला आणि सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य उमललं. आयपीएल 2026 मध्ये 15 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने धमाल केली. त्याने 16 डांवांत 48.50 च्या सरासरीने 237.30 च्या स्ट्राइक रेटने 776 धावा कुटल्या. त्यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचाही समावेश आहे. याच खेळीमुळे क्रिकेट जगताने, अनेक दिगज्जांनी वैभवची दखल घेतली आणि वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली. तो भारतासाठी खेळणारा सर्वात युवा खेळाडू बनला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us