‘केजीएफ’ स्टार यशने नाकारली रावणाची भूमिका; तब्बल इतक्या कोटींची ऑफर धुडकावली

नितेश तिवारी यांचा हा चित्रपट 2025 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बॉलिवूडमधील हा बिग बजेट चित्रपट असेल. यामध्ये बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकारसुद्धा भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

केजीएफ स्टार यशने नाकारली रावणाची भूमिका; तब्बल इतक्या कोटींची ऑफर धुडकावली
अभिनेता यश
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 11, 2024 | 2:57 PM

नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून सेटवरून काही फोटोसुद्धा लीक झाले. यामध्ये अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम तर प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत आहे. या चित्रपटातील इतर भूमिकांवरूनही पडदा उचलण्यात आला आहे. मात्र रावणाची भूमिका कोण साकारणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘केजीएफ’ स्टार यशला रावणाच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, असं म्हटलं जात होतं. मात्र आता यशने या भूमिकेला नकार दिल्याचं कळतंय. रावणाच्या भूमिकेसाठी यशला तगडं मानधन देण्यात येणार होतं. मात्र या मानधनाला न भुलता यशने भूमिकेला नकार दिला आहे.

रावणाच्या भूमिकेसाठी यशला तब्बल 80 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. ही भूमिका नाकारूनही यश या चित्रपटाद्वारे कमाई करणार आहे. यामागचं कारण म्हणजे तो या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एक आहे. त्यामुळे ‘रामायण’ या चित्रपटातून तो 80 कोटी रुपयांपेक्षा अधिक नफा कमावणार हे नक्की. गेल्या काही दिवसांपासून ‘रामायण’ या चित्रपटाच्या सेटवरून बरेच फोटो लीक होत आहे. या फोटोंमध्ये अभिनेते अरुण गोविल हे दशरथ यांच्या लूकमध्ये दिसले. तर अभिनेत्री लारा दत्त ही कैकेयीच्या भूमिकेत दिसून आली. सेटवरील फोटो लीक झाल्यानंतर आता नितेश तिवारी यांनी ‘नो फोन पॉलिसी’ लागू केली आहे. त्यामुळे चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर कोणालाच फोन वापरण्याची परवानगी नसेल.

‘एएनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, कुंभकरणाच्या भूमिकेसाठी अभिनेता बॉबी देओलचा विचार केला जातोय. तर रावणाचा छोटा भाऊ विभीषणाच्या भूमिकेसाठी विजय सेतुपतीला ऑफर देण्यात आली आहे. या बिग बजेट चित्रपटात बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.

‘रामायण’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी आधी अभिनेत्री आलिया भट्टच्या नावाची चर्चा होती. मात्र आलियाच्या जागी प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीची निवड झाल्याचं कळतंय. अभिनेता सनी देओल यामध्ये हनुमानाच्या भूमिकेत असून लारा दत्ता कैकेईची भूमिका साकारणार आहे. फक्त साई पल्लवीच नाही तर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आणखी एक मोठं नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. अभिनेता विजय सेतुपती या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. काही रिपोर्ट्सनुसार, हनुमानाच्या भूमिकेसाठी अभिनेता सनी देओल कसून तयारी करत आहे. या भूमिकेसाठी तो फारच उत्सुक आहे.