मोठी बातमी! उद्धव ठाकरे-राज ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार; अधिकृत वेळ, तारीख समोर!
उद्या म्हणजेच 24 डिसेंबर रोज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन युतीसंदर्भात घोषणा करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

MNS-UBT Alliance : राज्यात सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रमुख पक्ष युती आणि आघाड्यांचे गणित जुळवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. ठाणे, मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड यासह एकूण 29 महानगरपालिकांची निवडणूक सोबत होत आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाईल. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांवर सत्ता मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांचा मनसे या दोन्ही पक्षांकडून युतीसाठी प्रयत्न केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता या प्रयत्नांना यश आले असून युतीसाठी जागावाटपही पूर्ण झाले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार आता राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र येऊन युतीची घोषणा करणार आहेत. राऊत यांनी या युतीच्या घोषणेची अधिकृत तारीखदेखील सांगितली आहे.
दोन्ही भाऊ एकत्र येऊन युतीची घोषणा करणार
संजय राऊत आज (23 डिसेंबर) माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी मनसे आणि ठाकरे गटात युतीबाबतची चर्चा पूर्ण झालेली आहे. मुंबई महापालिकेसाठी जागावाटपही ठरलेले आहे. त्यामुळे आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 24 डिसेंबर 2025 रोजी एकत्र येऊन दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतील. पत्रकार परिषदेत हे दोन्ही नेते युतीबाबत सांगतील, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन युतीचीच घोषणा करतील, असेच संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.
मनसे-ठाकरे गटाची युती कोण-कोणत्या महापालिकांसाठी?
संजय राऊत यांनी दिलेल्याा माहितीनुसार मनसे आणि ठाकरे गटाची युती ही मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या सात महापालिकांसाठी असेल. दोन्ही पक्षांत जागावाटपाचेही सूत्र ठरले आहे, अशी माहिती संजयर राऊत यांनी दिली. विशेष म्हणजे आता मुंबईत काँग्रेसला सोबत घेऊन लढण्याचा विषय आता मागे पडला आहे. आमच्या युतीमध्ये काँग्रेस नसेल, असेही राऊत यांनी सांगितले आहे.
