
गेल्या काही दिवसांपासून ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे. आता हा वाद शिगेला पोहोचला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यासंदर्भातील इतिहासाबाबत चुकीची विधानं केली आहेत, असा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी चित्रपटाचं प्रदर्शन थांबवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने चित्रपटाचं सेन्सॉर प्रमाणपत्र एक महिना निलंबित केलं आहे. या कालावधीत चित्रपटासंदर्भात चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर अंतिम निर्णय होईपर्यंत हे प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट आज (8 ऑगस्ट) थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु हे प्रदर्शन थांबवण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
चित्रपटातील ऐतिहासिक चुकीच्या गोष्टींबद्दल, आगामी उत्सवाच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या शक्यतेबद्दल राज्याने चिंता व्यक्त केली आहे. राज प्रीतम मोरे दिग्दर्शित हा चित्रपट एका मुस्लिम मुलाच्या वैयक्तिक जीवनातील अनुभवांमधून छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेण्याच्या प्रवासावर केंद्रित आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांना 2019 मध्ये त्यांच्या ‘खिस्सा’ या मराठी लघुपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता.
दरम्यान ‘खालिद का शिवाजी’च्या प्रदर्शनाबाबतच्या या निर्णयाविषयी राज मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता कारवाईबाबत आम्ही पुढील पर्याय पडताळून पाहू, असं ते म्हणाले. तर राज्याचे सांस्कृतिक विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांनी केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाला या चित्रपटाचं पुन:परीक्षण करण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाला करावी, अशी मागणी करणारं पत्र लिहिलं आहे.
या चित्रपटात खालिद या मुस्लीम मुलाची कथा दाखवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्याची असणारी ओढ आणि त्याच्या बालमनाने त्यांच्या कार्याचा घेतलेला शोध याची कथा चित्रपटात अधोरेखित करण्यात आली आहे. मात्र चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या आधारे कधीच भेदभाव केला नाही, हे स्पष्ट करताना त्यांच्या सैन्यात 35 टक्के मुसलमान सैनिक होते, असा उल्लेख आहे. तसंच या मुसलमान सैनिकांनी नमाज पठण करता यावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती, असाही उल्लेख त्यात आहे. याबद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे.