Khalid Ka Shivaji : रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली? वादावर दिग्दर्शक स्पष्टच म्हणाले..
'खालिद का शिवाजी' या चित्रपटावर आक्षेप घेतला जात असताना आता दिग्दर्शक राज मोरे यांनी त्यांची बाजू मांडली आहे. चित्रपटावरून घेतलेल्या चार प्रमुख आक्षेपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यापैकीच एक आक्षेप आहे की, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद बांधली होती का?

राज मोरे दिग्दर्शित ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. येत्या 8 ऑगस्ट रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. परंतु त्यापूर्वीच या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. हिंदू महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. यामध्ये चुकीचा इतिहास दाखवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशातच दिग्दर्शकांनी त्यांची बाजू मांडली आहे. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटावर चार प्रमुख आक्षेप नोंदवले गेले आहेत. त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यापैकीच एक मुद्दा म्हणजे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची मशीद बांधली होती का?
काय म्हणाले दिग्दर्शक?
“याबाबतही काही गोष्टी आपल्यासमोर मांडणं आवश्यक आहे. मुळात पहिल्यांदा हे बघावं लागेल की रायगडावर मशीद होती की नाही? याबाबत आपल्याला कालसापेक्ष विचार करावा लागेल. 1964 साली भारत सरकारने प्रकाशित केलेल्या कुलाबा गॅझेटीयरमधे पान क्र. 928 वरील शेवटच्या परिच्छेदात रायगडावरील परिच्छेदात मशिदीचा उल्लेख आला आहे. यात संबंधित वास्तुचं मोजमापही स्पष्टपणे नोंदवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने 1962 साली प्रकाशित केलेल्या शांताराम विष्णु आवळसकर लिखित रायगडाची जीवनकथा या संशोधनात्मक पुस्तकाच्या पान क्र. २२ वर किल्ले रायगडाचा नकाशा दिला आहे. त्यात महादरवाज्याच्या आत गेल्यावर डाव्या हाताला दारूच्या कोठारा समोर ‘पीर’ लिहून मशिदीची आकृती चितारण्यात आली आहे. अर्थात ती मशीद छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतली याबाबतचा उल्लेख नागपूर विद्यापिठाच्या इतिहासशास्त्र विभागाचे प्रमुख, इतिहास संशोधक प्रा.मा.मा. देशमुख लिखित मध्ययुगीन भारताचा इतिहास युगप्रवर्तक शिवराज आणि मराठ्यांची शौर्यगाथा भाग तिसरा या पुस्तकाच्या पान क्र. 51 वर “शिवाजीने रायगडावर मुसलमानांसाठी मशीद बांधली होती” असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे.”
“या पुस्तकावर आधी महाराष्ट्र सरकारने बंदी घातली होती. मात्र त्या बंदी विरोधात उच्च न्यायालयात स्पष्टीकरण आणि पुरावे सादर केल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने ती बंदी उठवण्यात आली. याशिवाय रायगडावर गेल्यावर आपल्या हेही लक्षात आल्याशिवाय रहाणार नाही की रायरेश्वराच्या मंदिराचं स्थापत्य महाराजांनी स्वत: हिंदू-मुस्लीम स्थापत्यशैलीत करून घेतलं. यावरून महाराजांना परधर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा द्वेश होता असं म्हणता येणार नाही. उलट काफी खानाने लिहिलेल्या समकालीन इतिहासात अशी नोंद सापडते की छत्रपती शिवाजी महाराजांना युद्धादरम्यान मुस्लीम धर्मग्रंथ सापडले, तर महाराज ते ग्रंथ सैन्यातील मुस्लीम सैनिकांना देऊन टाकत असे,” असं मोरे यांनी स्पष्ट केलं.
यापुढे दिग्दर्शकांनी म्हटलंय की, “एक महत्त्वाची गोष्ट आपण रसिक मायबापांनी लक्षात घ्यायला हवी की, आम्ही कलाकार मंडळी आहोत, इतिहास संशोधक नाही. त्यामुळे इतिहास संशोधकांनी केलेलं इतिहास संशोधनावर आम्ही विश्वास ठेवून संवाद लिहितो.”
दरम्यान हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी पुण्यातील सर्व चित्रपटगृहांना हा चित्रपट दाखवू नये अशी विनंती केली आहे. तसंच ग्रामीण भागात हा चित्रपट दाखवला तर तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाबद्दल जागरूकता मोहीम राबवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. हिंदू महासंघाने असाही दावा केला आहे की या चित्रपटाद्वारे इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू आणि मराठा समाजाचे आहेत आणि ‘खालिद का शिवाजी’सारखं शीर्षकच अस्वीकार्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
