Khalid Ka Shivaji : ‘खालिद का शिवाजी’वर बंदीची मागणी तीव्र; सेन्सॉर बोर्डाला पत्र, का होतोय विरोध?
राज मोरे दिग्दर्शित 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची तीव्र मागणी केली जात आहे. हिंदू महासंघाने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिलं आहे.

‘खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबईतल्या एका स्थानिक हिंदू संघटनेनं या चित्रपटावर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डाकडे त्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा चित्रपट येत्या 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुणे इथल्या हिंदू महासंघाने सेन्सॉर बोर्ड आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना निषेधाचं पत्र पाठवलं आहे. “चित्रपटाच छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष शासक म्हणून दाखवण्यात आलं आहे, जे त्यांच्या खऱ्या ओळखीच्या विरुद्ध आहे. जर या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणली नाही तर आम्ही थिएटरबाहेर निषेध करू”, असा इशारा हिंदू महासंघाच्या आनंद दवेंनी दिला.
आनंद दवे यांनी पुण्यातील सर्व चित्रपटगृहांना हा चित्रपट दाखवू नये अशी विनंती केली आहे. तसंच ग्रामीण भागात हा चित्रपट दाखवला तर तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासाबद्दल जागरूकता मोहीम राबवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. हिंदू महासंघाने असाही दावा केला आहे की या चित्रपटाद्वारे इतिहासाचं विकृतीकरण केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू आणि मराठा समाजाचे आहेत आणि ‘खालिद का शिवाजी’सारखं शीर्षकच अस्वीकार्य आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मोरे यांनी केलं आहे. ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटात खालिद या एका मुस्लिम मुलाची कथा दाखवण्यात आली आङे. जो त्याच्या जीवनातील विविध अनुभवांमधून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल शिकतो. या चित्रपटात इतिहासाचा एक वेगळा दृष्टीकोन दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतु यामुळेच नवा वाद निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट ‘कान्स चित्रपट महोत्सवा’साठीही निवडला गेला आहे.
दरम्यान मंगळवारी वरळीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी करण्यात आली. ही घोषणाबाजी चालू असतानाच मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम खराब करू नका, असं आवाहन केलं. कार्यक्रम चालू असतानाच ही घोषणाबाजी झाल्याने काही काळासाठी सर्वत्र गोंधळ उडाला होता. पोलिसांनी नंतर घोषणाबाजी करणाऱ्यांना ताब्यात घेऊन बाहेर काढलं.
