छप्परतोड टाळ्या, शिट्ट्या, पिन ड्रॉप सायलेन्स..; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

आपल्या बेधडक मतांसाठी ओळखले जाणारे अभिनेते किरण माने हे तब्बल सहा वर्षानंतर रंगभूमीवर परतले आहेत. त्यांच्या या नाटकाचे फोटो पोस्ट करत किरण माने यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

छप्परतोड टाळ्या, शिट्ट्या, पिन ड्रॉप सायलेन्स..; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
Kiran Mane
Image Credit source: Instagram
| Updated on: Dec 25, 2025 | 9:13 PM

मराठी मालिका आणि नाटक क्षेत्रात अभिनेते किरण माने यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. ‘मुलगी झाली हो’ ही त्यांची मालिका चांगलीच गाजली होती. अभिनयासोबतच ते त्यांच्या बेधडक मतांसाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर विविध विषयांवर, प्रकरणांवर, मुद्द्यांवर ते मोकळेपणे व्यक्त होता. आता किरण माने तब्बल सहा वर्षांनंतर रंगभूमीवर नाट्यरसिकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पहिल्या प्रयोगाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. हा सगळा अनुभव भारावून टाकणारा होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे. या प्रयोगाला कोण कोण उपस्थित होते याचीही माहिती त्यांनी या पोस्टमध्ये दिली.

किरण मानेंची पोस्ट-

‘तब्बल सहा वर्षांनंतर रंगभूमीवर उभा राहिलो. पहिल्या प्रयोगाला कोल्हापुरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. छप्परतोड टाळ्या, शिट्ट्या आणि काही प्रसंगांमध्ये ‘पिन ड्रॉप सायलेन्स’.. सगळंच भारावून टाकणारं. रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदा मांडल्या गेलेल्या या ‘अनटोल्ड स्टोरी’चं लैच जबराट, भन्नाट, खतरनाक स्वागत झालं. साक्षात शाहू छत्रपती प्रयोगाला आवर्जून उपस्थित होते. असा आडवळणाचा इतिहास सांगताना मिळालेली छत्रपती घराण्याची दाद आमच्यासाठी अनमोल आहे. रविंद्र पोखरकर, मुकेश माचकर, ज्ञानेश महाराव सर थेट मुंबईवरून आले होते. निरंजन टकले सर नाशिकवरून आले होते. विदर्भातून आमची लाडकी मुक्ता कदमसुद्धा आली होती. साताऱ्याहून हमीद दाभोळकर, विजय मांडके, झाकिर शेख, संतोष भिलारकर, गजानन वाडेकर, प्रसाद देवळेकर आले होते. श्रेणीक नरदे, कविता ननावरे हे जिवलग आवर्जून आले होते. या सगळ्यांसह तमाम कोल्हापूरकरांनी ‘द किरण माने शो’ अक्षरशः डोक्यावर घेतला. आज दुसऱ्या मोहिमेसाठी सज्ज झालोय. जय शिवराय…जय भीम,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

किरण माने यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘सर जिंकलात आपण, कालचा प्रयोग भारीच झाला,’ असं एकाने लिहिलं. तर ‘अभिमान वाटला, सत्य मांडण्याचं धाडस एका धाडसी कलाकाराकडून होत आहे,’ असं दुसऱ्या युजरने म्हटलंय. ‘तुमचं उभं राहणं आज मितीला खूप आवश्यक होतं,’ असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.