नेटफ्लिक्सवर 6 एपिसोड्सची ही सीरिज प्रदर्शित होताच ट्रेंडमध्ये..; डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स अन् थ्रिलर

ज्या वेब सीरिजची प्रेक्षक आतुरतेने प्रतीक्षा करत होते, अखेर त्याचा दुसरा सिझन ओटीटीवर स्ट्रीम होत आहे. या सीरिजच्या कथेत सस्पेन्सचा भरणा असून शेवटच्या एपिसोडपर्यंत ती तुम्हाला खिळवून ठेवते.

नेटफ्लिक्सवर 6 एपिसोड्सची ही सीरिज प्रदर्शित होताच ट्रेंडमध्ये..; डोकं चक्रावून टाकणारा सस्पेन्स अन् थ्रिलर
Kohrra season 2
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 13, 2026 | 11:38 AM

हल्लीच्या काळात क्राइम थ्रिलर हा जॉनर प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अशा कंटेटला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. प्रेक्षकांना अशा कथा पहायला खूप आवडतात, ज्यामध्ये सस्पेन्स, रहस्य यांचा भरणा असेल आणि प्रत्येक एपिसोडनुसार रोमांच वाढत जाणारा असेल. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशी एक सीरिज नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सहा एपिसोड्सची ही सीरिज सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते. प्रत्येक एपिसोडनुसार कथेतील सस्पेन्स वाढत जातो. एका क्षणासाठीही याची कथा तुम्हाला कंटाळवाणी वाटू शकणार नाही.

सीरिजची कथा

या सीरिजची कथा पंजाबमधल्या दलेरपुरा या काल्पनिक गावात घडते. अमरपाल गरूंडी (बरून सोबती) हा पोलीस अधिकारी जगरानामधील आपलं जुनं आयुष्य सोडून नव्या पोस्टिंगनुसार दलेरपुराला पोहोचतो. पत्नी सिल्कीसोबत तो आयुष्याची नवी सुरुवात करतो. वरकरणी शांत दिसणाऱ्या या परिसरात अचानक एकेदिवशी हत्या प्रकरणाने खळबळ उडते. या केसमुळे संपूर्ण कथेची दिशाच बदलते. एनआरआय मुलगी प्रीत (पूजा बुमराह) ही तिच्या माहेरी कुरणात मृतावस्थेत आढळते. या हत्येचा तपासाची जबाबदारी एसआय धनवंत कौरला (मोना सिंह) सोपवली जाते. या प्रकरणाच्या सुरुवातीच्या चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे होतात. प्रीत गेल्या काही महिन्यांपासून तिच्या पती (रणविजय सिंघा) आणि दोन मुलांना सोडून माहेरीच राहत असल्याची बाब समोर येते. वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू असतानाच तिचं ड्रान्स इन्स्ट्रक्टरसोबत अफेअरसुद्धा सुरू असतं.

तपास जसजसा पुढे जातो, तशी आणखी एक गोष्ट समोर येते. प्रीतचा तिचा भाऊ अनुराग अरोरासोबत संपत्तीवरून वाद सुरू असतो. अशातच तिच्या हत्येचा संशय पती, डान्स इन्स्ट्रक्टर आणि भाऊ या तिघांवर असतो. प्रत्येक भूमिकेकडे उद्देश आणि संधी दोन्ही असतात. परंतु तपासादरम्यान आणखी एक डोकं चक्रावणारी गोष्ट समोर येते, ज्यामुळे हे प्रकरण फक्त मर्डर मिस्ट्रीपर्यंतच मर्यादित आहे, असं दिसून येत नाही. ही कथा समाजाच्या एका अशा कटू सत्याचा उघड करते, जो प्रेक्षकांना हादरवून सोडतो.

या सीरिजचा पहिला सिझन जवळपास तीन वर्षांपूर्वी नेटफ्लिक्सवर आला होता. यावेळी ओटीटीवरील सर्वोत्तम क्राइम थ्रिलरमध्ये याची गणना झाली होती. दमदार पटकथा, लेखन, अभिनय आणि पंजाबच्या पार्श्वभूमीवर रचलेली रहस्यमयी कथा यांना प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता दुसऱ्या सिझनमध्येही तोच सस्पेन्स आणि भावनिक गुंतागुंत आणखी प्रभावीपणे मांडण्यात आली आहे. हा नवीन सिझन सहा एपिसोड्सचा असून प्रत्येक एपिसोडच्या अखेरीस असा ट्विस्ट येतो, ज्यामुळे पुढचा एपिसोड पाहण्याची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचते.

या सीरिजमध्ये मोना सिंह आणि बरून सोबती मुख्य भूमिकेत आहेत. कोहराच्या पहिल्या सिझनमध्येही बरून झळकला होता. याशिवाय रणविजय सिंगा, वरूण बडोला, इकवाली खन्ना, हरलीन सेठी, रेचल शैली, अर्जुन भल्ला, मुस्कान अरोडा आणि मंदीप घई यांच्याही भूमिका आहेत.