सहा कीर्तनकार रत्नांपैकी कोण मारणार बाजी? आषाढी एकादशीला रंगणार अंतिम सोहळा

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या शोचा अंतिम सोहळा येत्या 6 जुलै रोजी पार पडणार आहे. सहा कीर्तनकारांपैकी कोण बाजी मारणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विजेत्याला वीणेच्या रूपातल्या चांदीची आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे.

सहा कीर्तनकार रत्नांपैकी कोण मारणार बाजी? आषाढी एकादशीला रंगणार अंतिम सोहळा
‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’
Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 03, 2025 | 1:11 PM

सोनी मराठी वाहिनीच्या ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या लोकप्रिय रिॲलिटी शोने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मनं जिंकली. यात सहभागी झालेल्या स्पर्धक कीर्तनकारांचा प्रवास हा प्रेक्षकांना अचंबित करणारा होता. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’च्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. आपल्या भारावून टाकणाऱ्या कीर्तनाने या सगळ्या कीर्तनकारांनी महाराष्ट्राला मंत्रमुग्ध केलं. यात सहभागी सर्वच कीर्तनकारांच्या कीर्तन सादरीकरणाला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळाली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अनेक उत्तमोत्तम कीर्तनकारांमधून सहा सर्वोत्तम कीर्तनकार स्पर्धकांनी आता अंतिम फेरी गाठली आहे.

हरिनामाचा गजर करत दर्शनासाठी आतुरलेला वारकरी आणि लाखोंच्या संख्येने होणारा टाळमृदंगाचा नाद अशा भक्तिमय वातावरणात गेली कित्येक वर्षे पंढरपूरची वारी अविरतपणे सुरू आहे. कीर्तनातून संतवाणी ऐकण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने वारकऱ्यांना मिळते. यंदा हीच संधी प्रेक्षकांना घरबसल्या सोनी मराठी वाहिनीमुळे मिळणार आहे. ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाचा अंतिम सोहळा येत्या 6 जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी रंगणार आहे.

सहा स्पर्धकांमध्ये ही महाअंतिम लढत रंगणार आहे. अप्रतिम कीर्तन सादर करुन प्रेक्षकांची मन जिंकलेल्या पहिले कीर्तन रत्न – ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील, दुसरे कीर्तन रत्न – ह.भ.प.प्रमोद महाराज डुकरे , तिसरे कीर्तन रत्न – ह.भ.प.हर्षद महाराज भागवत, चौथे कीर्तन रत्न- ह.भ.प.सोमनाथ महाराज बदाले, पाचवे कीर्तन रत्न- ह.भ.प.कल्याणी महाराज मोरे, सहावे कीर्तन रत्न- ह.भ.प.लक्ष्मण महाराज लटपटे या सहा कीर्तनकार रत्नांपैकी कोण बाजी मारणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. यातील विजेत्या स्पर्धकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेल्या वीणेच्या रूपातल्या चांदीची आकर्षक ट्रॉफी मिळणार आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी रविवार 6 जुलैला हा अंतिम सोहळा सकाळी 8 वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ या माध्यमातून सोनी मराठी वाहिनीने उत्तम प्रतिभा आणि गुणी हिऱ्यांना योग्य ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. या अभिनव संकल्पनेला कीर्तनकार स्पर्धकांनी, परीक्षकांनी आणि महत्त्वाचं म्हणजे प्रेक्षकांनी तितकीच उत्तम साथ दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us