जे ‘बॉर्डर 2’लाही जमलं नाही, ते या मराठी चित्रपटाने करून दाखवलं; तब्बल 600% परतावा

जानेवारी 2026 मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक नफा कमावलेला चित्रपट कोणता होता? अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या मराठी चित्रपटाने तर कमालच केली. या चित्रपटाने सनी देओलच्या 'बॉर्डर 2'लाही मागे टाकलं आहे.

जे बॉर्डर 2लाही जमलं नाही, ते या मराठी चित्रपटाने करून दाखवलं; तब्बल 600% परतावा
मराठी चित्रपट
Image Credit source: Youtube
| Updated on: Feb 20, 2026 | 8:51 AM

यावर्षी जानेवारी महिन्यात बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक नफा कमावणारा चित्रपट बॉलिवूड किंवा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतला नाही, तर एक प्रादेशिक चित्रपट आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने निर्मात्यांना तब्बल 600 टक्क्यांनी परतावा दिला आहे. ऑरमॅक्स मीडियाचा जानेवारी महिन्याचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या दहा चित्रपटांची यादी देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या क्रमाकांवर सनी देओलचा ‘बॉर्डर 2’ हा चित्रपट आहे, तर दहाव्या क्रमांकावरील एका मराठी चित्रपटाने सर्वांचं विशेष लक्ष वेधलं आहे. कारण या यादीतील नऊ चित्रपट बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील असून दहाव्या क्रमांकावर फक्त एकच मराठी चित्रपट आहे.

जानेवारी महिन्यात जरी ‘बॉर्डर 2’ची सर्वाधिक चर्चा झाली असली आणि कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट वरचढ ठरला असला तरी ‘बॉर्डर 2’च्या निर्मात्यांना आतापर्यंत फक्त 30 टक्केच नफा मिळाला आहे. नफ्याचा हिशोब पाहिला तर या मराठी चित्रपटाने ‘बॉर्डर 2’सह इतर सर्व चित्रपटांना मागे टाकलं आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’. 1 जानेवारी 2026 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि वर्ड-ऑफ-माऊथच्या जोरावर त्याने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटात मराठी शाळांची कथा दाखवण्यात आली आहे. एका भ्रष्ट राजकारण्याला मराठी शाळा पाडून त्या जागी आंतरराष्ट्रीय इंग्रजी माध्यमाची शाळा बांधायची असते. अशा वेळी त्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांच्या माजी विद्यार्थ्यांना बोलावतात आणि ते एकत्र येऊन त्यांची मातृभाषा आणि ओळख जपण्यासाठी लढतात. या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, प्राजक्ता कोळी, कादंबरी कदम यांच्या भूमिका आहेत.

बॉक्स ऑफिस कलेक्शन

‘क्रांतिज्योती विद्यालय’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 7.8 दशलक्ष कमावले. पहिल्या वीकेंडला माऊथ पब्लिसिटीमुळे जोरदार कमाई झाली. त्यामुळे पहिल्या आठवड्यातच चित्रपटाने बजेट मिळवला. 11 दिवसांत या चित्रपटाने 11.40 कोटी रुपये कमावले आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत कमाईचा हा आकडा 23 कोटींवर पोहोचला. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचा बजेट जवळपास 4 कोटी रुपये आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची अंदाजे 28 ते 30 कोटींची कमाई केली. बजेट आणि कमाईची तुलना केल्यास या चित्रपटाने निर्मात्यांना 600 टक्क्यांपेक्षा जास्त नफा दिला.