
क्रिस्टल डिसूझा ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकांसोबतच तिने चित्रपट आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपल्या दमदार अभिनयकौशल्याची चुणूक दाखवली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी क्रिस्टल सतत देशविदेशात फिरतानाचे आणि आलिशान आयुष्य जगतानाचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. परंतु इतका पैसा येतो कुठून, असा प्रश्न काही नेटकऱ्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर क्रिस्टलला काहींनी ‘गोल्ड डिगर’ (अशी व्यक्ती जी फक्त पैसे उकळण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये येते किंवा लग्न करते) असंही म्हटलंय. अशा टीकाकारांनाही क्रिस्टलने सडेतोड उत्तर दिलं आहे.
‘झूम टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टल म्हणाली, “मी दोन वर्षांसाठी टेलिव्हिजनमधून ब्रेक घेतला. त्या दोन वर्षांत मी मनसोक्त हिंडले, फिरले, सोलो ट्रिपवर गेले. जी कामं मी करू शकत नव्हती, ती सर्व कामं केली. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत फिरायला गेली. प्रत्येक कार्यक्रम आणि सण-उत्सव साजरे केले. मग मला एकता कपूर यांनी ‘फितरत’ या वेब सीरिजची ऑफर दिली. मी गोल्ड डिगरच्या भूमिकेसाठी परफेक्ट असेन, असं त्या म्हणाल्या. मी त्यांना म्हटलं की, मला खऱ्या आयुष्यातही गोल्ड डिगर व्हायला आवडेल. परंतु या सीरिजनंतर लोकांना मला खूप ट्रोल केलं. हिच्यासारख्या मुलींसोबत असंच झालं पाहिजे, अशी माझ्यावर टीका केली.”
“खरं सांगायचं झालं तर मी गोल्ड डिगर आहे, फक्त मला गोल्डवाला पुरुष अद्याप भेटत नाहीये. म्हणूनच मी स्वत: गोल्ड बनलेय आणि माझ्यातूनच सोन्याचा खजिना बाहेर काढतेय. मला गोल्ड डिगर म्हणणारी ती मुलं आहेत तरी कुठे? आधी मला किमान सोनं दाखवा तरी. तुमचा ‘रेड फ्लॅग’ हेच तुमच्यासाठी सोनं आहे”, अशा शब्दांत क्रिस्टलने उत्तर दिलं. या मुलाखतीत क्रिस्टलने तिच्या पार्टनरचाही खुलासा केला. दुबईतील बिझनेसमन गुलाम गौस दीवानीला डेट करत असल्याचं तिने सांगितलं.
या मुलाखतीत क्रिस्टलने प्लास्टिक सर्जरीबाबतही खुलासा केला. “तुम्हाला नाकावर प्लास्टिक सर्जरी करायची असेल तर बिनधास्त करा. जर इच्छा नसेल तर करू नका. हा निर्णय तुमचा आहे. मी कधीच प्लास्टिक सर्जरी केली नाही. पण काही बेसिक गोष्टी नक्कीच केल्या आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर, बोटॉक्स, फेशिअल्स, फिलर्स वगैरे. ज्या गोष्टींमुळे माझ्यात अधिक आत्मविश्वास येतो, त्या मी आवर्जून केल्या आहेत. हे सर्व मी स्वत:साठी करते, इतर कोणासाठीच नाही. हे माझं शरीर आहे, हा माझा पैसा आहे, जर तुम्हाला काही समस्या असेल तर ती तुमची डोकेदुखी आहे. आधीचे आणि नंतरचे फोटो पोस्ट करून तुम्ही तुमचाच वेळ वाया घालवत आहात”, असं तिने स्पष्ट केलं.