मराठमोळ्या अभिनेत्रीचा लग्नाच्या 9 वर्षांनंतर घटस्फोट; नवऱ्याने लिहिली पोस्ट

'कुमकुम भाग्य' फेम अभिनेत्री लग्नाच्या नऊ वर्षांनंतर पतीपासून विभक्त झाली. मुग्धा चाफेकर असं या अभिनेत्रीचं नाव असून तिच्या नवऱ्याने घटस्फोटाविषयीची पोस्ट सोशल मीडियावर लिहिली आहे.

मराठमोळ्या अभिनेत्रीचा लग्नाच्या 9 वर्षांनंतर घटस्फोट; नवऱ्याने लिहिली पोस्ट
Mugdha Chaphekar
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 06, 2025 | 10:10 AM

‘सतरंगी ससुराल’, ‘कुमकुम भाग्य’, ‘धरती का वीर योद्धा पृथ्वीराज चौहान’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारलेली अभिनेत्री मुग्धा चाफेकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. लग्नाच्या नऊ वर्षांनंतर मुग्धाचा घटस्फोट झाला आहे. रवीश देसाईने सोशल मीडियावर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. मुग्धा आणि रवीश हे 2014 मध्ये ‘सतरंगी ससुराल’ या मालिकेच्या सेटवर पहिल्यांदा भेटले होते. या मालिकेत एकत्र काम करताना दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मुग्धा आणि रवीशने 30 जानेवारी 2016 रोजी साखरपुडा केला. त्यानंतर त्याच वर्षी 16 डिसेंबर रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली.

रवीशने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं, ‘खूप विचार आणि चिंतनानंतर मुग्धा आणि मी पती-पत्नी म्हणून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघं आता आपापल्या स्वतंत्र मार्गाने आयुष्यात पुढे जाणार आहोत. याला एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. प्रेम, मैत्री आणि एकमेकांविषयी आदर असा हा आमचा सुंदर प्रवास होता. आयुष्यभर हे सर्व आमच्यासोबत राहील. आम्ही आमच्या प्रिय चाहत्यांना, हिंतचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की त्यांनी आमच्या या निर्णयाला पाठिंबा द्यावा. यातून सावरण्यासाठी आवश्यक असलेली गोपनीयता आम्हाला द्यावी. कृपया कोणत्याही खोट्या कथा आणि विधानांवर विश्वास ठेवू नका. तुमच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद ‘

रवीशने या पोस्टमधील कमेंट्स बंद केले आहेत, जेणेकरून कोणीच त्यावर प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. घटस्फोटाच्या या वृत्तावर अद्याप मुग्धाने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. तिने सोशल मीडियावर कोणती पोस्टही लिहिली नाही. मुग्धाने ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत प्राचीची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगलीच गाजली आहे. तर रवीश देसाईने ‘एक ननद की खुशियों की चाबी- मेरी भाभी’, ‘सतरंगी ससुराल’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलंय. त्याने ‘मेड इन हेव्हन’ आणि ‘स्कूप’ यांसारख्या वेब सीरिजमध्येही भूमिका साकारल्या आहेत.