गुजराती सैराट, 50 लाखांत बनलेल्या चित्रपटाची 100 कोटींकडे वाटचाल, आता हिंदीतही येणार

अवघ्या 50 लाख रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 70 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

गुजराती सैराट, 50 लाखांत बनलेल्या चित्रपटाची 100 कोटींकडे वाटचाल, आता हिंदीतही येणार
लालो कृष्ण सदा सहायते चित्रपट
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 21, 2025 | 11:05 AM

उत्कृष्ट कथानक, कलाकारांचं दमदार अभिनय आणि योग्य दिग्दर्शन लाभलं की चित्रपटाला आवर्जून बॉक्स ऑफिसवर यश मिळतं. अनेक प्रादेशिक चित्रपट याचं उत्तम उदाहरण आहेत. नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’सुद्धा असाच एक चित्रपट आहे. मराठी भाषेतल्या या चित्रपटाला देशभरातून जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता असंच काहीसं एका गुजराती चित्रपटाबाबत घडताना दिसतंय. या चित्रपटाने संपूर्ण गुजराती फिल्म इंडस्ट्रीला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय. या चित्रपटाचं नाव आहे ‘लालो कृष्ण सदा सहायते’. गुजराती भाषेत ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर आता हा चित्रपट हिंदी प्रेक्षकांवरही आपला प्रभाव पाडण्यास सज्ज झाला आहे. येत्या 28 नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु हा डब केलेला व्हर्जन असेल. या चित्रपटाने केवळ बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रमच रचले नाहीत, तर त्यातील भावनिक आणि अध्यात्मिक चित्रणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय.

थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी

मूळ गुजराती भाषेतील हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. याच्या कमाईची सुरुवात मात्र धीम्या गतीने झाली होती. परंतु तिसऱ्या आठवड्यापासून प्रेक्षकांच्या माऊथ पब्लिसिटीने आपली कमाल दाखवली. अखेर चौथा आठवडा येता येता हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. थिएटर्समध्ये प्रेक्षक गर्दी करू लागले होते. या चित्रपटाच्या लोकप्रियतेचा अंदाज या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की हा पहिला असा गुजराजी चित्रपट आहे, ज्याने एकाच दिवसात 5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. गुजराती फिल्म इंडस्ट्रीसाठी ही खूप मोठी बाब आहे.

बजेट फक्त 50 लाख रुपये

आतापर्यंत या चित्रपटाने 71 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. लवकरच त्याची कमाई 100 कोटींच्या घरात पोहोचणार आहे. कोणत्याही गुजराती चित्रपटासाठी हे अद्भुत यश आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा बजेट फक्त 50 लाख रुपये आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अंकित सकियाने केलंय. या चित्रपटाच्या यशात कलाकारांचं योगदानसुद्धा उल्लेखनीय आहे. यामध्ये रीवा रच्छ, श्रुहद गोस्वामी, करण जोशी, अन्शु जोशी आणि किन्नल नायक यांच्याही भूमिका आहेत. सध्या या चित्रपटाचे निर्माते त्याच्या डबिंगवर काम करत आहेत. त्यानंतर या चित्रपटाकडून सेन्सॉरचं प्रमाणपत्र घेतलं जाईल आणि मग तो थिएटरमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.