
बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या बंगल्याजवळ बी. पी. पटेल चौकात रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे. रस्त्याच्या एका बाजूला बिग बींचा बंगला आहे तर दुसऱ्या बाजूला बी. पी. पटेल चौक असून तिथेच जुहू बीचकडे जाणाराही मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्याच्या मधोमधच मोठा खड्डा पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण होते. तसंच तिथे कुठलंही बॅरिकेडिंग केलेलं नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुनील जैन याबिया यांनी बिग बींच्या बंगल्याबाहेरील या खड्ड्याभोवती चुन्याने खूण केली आहे, जेणेकरून कोणताही अपघात होऊ नये. यावेळी त्यांनी रस्त्यांच्या बोगस कामाकडेही लक्ष वेधलं आहे.
मुंबईच्या जुहू परिसरात अमिताभ बच्चन यांच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेरील मुख्य रस्ता खचला आहे. जलसा बंगल्याबाहेरील बिर्ला लेनवर अचानक मुख्य रस्त्यावर भलामोठा खड्डा पडला आहे. या रस्त्यावर मोठा संख्येनं गाड्या ये-जा करत असतात. सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. जुहू परिसर हा हाय प्रोफाईल परिसर असून या ठिकाणी सकाळी वॉकसाठी मोठ्या संख्येनं अनेकजण येतात. अशावेळी एखाद्या व्यक्तीचा खड्ड्यात पडून दुर्दैवी मृत्यू होण्याचीही शक्यता आहे. रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याची माहिती मिळतच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी सुनील जैन खबिया यांनी धाव घेत खड्ड्याचा आजूबाजूला चुन्याने मार्किंग केली आहे.
यावेळी पालिकेत महापौर कोण होणार, चांगलं खातं कोणाला मिळणार, पालिकेच्या अधिकाऱ्यांची याकडेच अधिक लक्ष आहे. त्यांनी त्याऐवजी नागरिकांच्या हिताचं काम करावं, असा टोला सुनील खबिया यांनी लगावला आहे. त्यासोबतच या रस्त्याशी संबंधित मुंबई महानगर पालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यावरदेखील कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“या परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिक ये-जा करत असतात. अमिताभ बच्चनसुद्धा इथेच राहतात. मुंबईकरांना सतत सरकारकडून सांगितलं जातं की आम्ही तुमच्यासाठी चांगलं काम करू, चांगल्या सुविधा देऊ, हेच चांगले दिवस आहेत का? रस्त्यांची ही अवस्था झाली आहे. जुहू तारा रोडला मोठं जंक्शन आहे आणि त्या जंक्शनवर जर असे खड्डे पडत असतील तर मुंबईची काय अवस्था आहे हे तुम्ही समजूच शकता. शिवाय या खड्ड्याभोवती बॅरिकेडिंगसुद्धा केलेली नाही. हा खड्डा बुजवण्याचं काम लवकरात लवकर झालं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया सुनील जैन खाबिया यांनी दिली आहे.
रस्त्याच्या मधोमध इतका मोठा खड्डा पडतोच कसा आणि अचानक रस्ता अशा पद्धतीने खचतो कसा, असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. शिवाय तिथे बॅरिकेडिंग न केल्याने अनेकांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाने लवकरात लवकर हा खड्डा बुजवून रस्ता पुन्हा व्यवस्थित करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. मुंबईतल्या रस्त्यावर अशा पद्धतीने मोठा खड्डा पडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक ठिकाणी अशा पद्धतीने रस्ता खचल्याचं पाहिलं गेलं. यावरून रस्त्यांच्या दर्जाबाबत आणि रस्ते बांधणीसाठी वापरल्या गेलेल्या कच्च्या मालाबाबत प्रश्न उपस्थित होतात.