इंडस्ट्रीतील सर्वांत वयस्कर अभिनेत्रीचं निधन; दिलीप कुमार-देव आनंद यांच्यासोबत होते प्रेमसंबंध

हिंदी सिनेसृष्टीतील सर्वांत वयस्कर अभिनेत्रीचं निधन झालं आहे. कामिनी कौशल यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. 1940 ते 1960 च्या दशकात त्या इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होत्या.

इंडस्ट्रीतील सर्वांत वयस्कर अभिनेत्रीचं निधन; दिलीप कुमार-देव आनंद यांच्यासोबत होते प्रेमसंबंध
Kamini Kaushal
Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2025 | 1:35 PM

हिंदी सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वयाच्या 98 व्या वर्षी निधन झालं आहे. कामिनी कौशल या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रमुख अभिनेत्रींपैकी एक होत्या. 1940 ते 1960 च्या दशकात त्यांनी विविध चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. दिलीप कुमार आणि देव आनंद यांच्यासोबत त्यांचे प्रेमसंबंध चर्चेत होते. कामिनी यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. कामिनी यांचं कुटुंब नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिलं आहे. त्यामुळे त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचं आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आलं आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी फिल्म इंडस्ट्रीवर मजबूत छाप सोडली आहे. 1946 ते 1963 पर्यंत त्यांनी चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केलंय. फिल्म इंडस्ट्रीतील त्या सर्वांत वयस्कर अभिनेत्री होत्या.

कामिनी कौशल यांनी सात दशकांपर्यंत इंडस्ट्रीत काम केलं. 1946 मध्ये ‘नीचा नगर’ या चित्रपटातून त्यांनी करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाने पहिल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला होता. ‘पाम डी’ओर’ जिंकणारा हा एकमेव भारतीय चित्रपट होता. यामुळे एक प्रतिभावान नवोदित कलाकार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी 1946 ते 1963 या काळात ‘दो भाई’, ‘शहीद’, ‘नदियाँ के पार’, ‘जिद्दी’, ‘शबनम’, ‘पारस’, ‘नमुना’, ‘आरजू’, ‘नमूना’, ‘जेलर’, ‘नाईट क्लब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

कामिनी कौशल यांचं मूळ नाव उमा कश्यप असं होतं. लाहोरमधील एका उच्चशिक्षित कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील शिवराम कश्यप हे प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ होते. कामिनी यांनी बालपणी घोडेस्वारी, भरतनाट्यम, पोहणे, हस्तकला यांसारखी अनेक कौशल्ये शिकली होती. त्यांनी रेडिओ नाटकं आणि नाट्यगृहांमध्येही भाग घेतला होता.

कामिनी यांनी दिलीप कुमार, राज कपूर, देव आनंद आणि अशोक कुमार यांच्यासह अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलंय. ‘नदियाँ के पार’, ‘शहीद’, ‘शबनम’ आणि ‘आरझू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिलीप कुमार यांच्यासोबतची तिची ऑनस्क्रीन केमिस्ट्री खूप गाजली. शिवाय ऑफस्क्रीनही त्यांच्या अफेअरची चर्चा होती. परंतु कामिनी यांनी त्यांच्या बहिणीच्या निधनानंतर भावोजी बी. एस. सूद यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.