Sikandar: ‘आयुष्यातील सर्वांत वाईट..’; सलमानचा ‘सिकंदर’ पाहिलेल्यांनी पैसे परत देण्याची केली मागणी

सलमान खानच्या 'सिकंदर' या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अनेकांनी सलमानच्या या चित्रपटावर टीका केली आहे. कथेत दम नसल्याचं काहींनी म्हटलंय. तर चित्रपटातील सलमानच्या दिसण्यावरूनही अनेकांनी टोला लगावला आहे.

Sikandar: आयुष्यातील सर्वांत वाईट..; सलमानचा सिकंदर पाहिलेल्यांनी पैसे परत देण्याची केली मागणी
Image Credit source: Instagram
| Updated on: Apr 01, 2025 | 11:02 AM

बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात अभिनेता सलमान खानच्या ‘सिकंदर’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता होती. परंतु या चित्रपटाने प्रेक्षकांची पुरती निराशा केल्याचं पहायला मिळतंय. 30 मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण देशभरातील थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवसापासून ज्यांनी हा चित्रपट पाहिला, त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. 2023 नंतर आता ईदच्या मुहूर्तावर सलमानचा चित्रपट प्रदर्शित झाल्याने, काही चाहते खूपच खुश आहेत. तर काहींनी ‘सिकंदर’च्या कथेविषयी नाराजी व्यक्त केली. ए. आर. मुरुगादोस दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबतच रश्मिका मंदाना, सत्यराज, काजल अग्रवाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

‘सिकंदर’ पाहिलेल्यांच्या प्रतिक्रिया

सलमानचा ‘सिकंदर’ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिलं, ‘पैसे वाया गेले.’ या चित्रपटातील व्हिज्युअल्सवर टीका करत त्याने पुढे लिहिलं, ‘अत्यंत वाईट क्वालिटी.’ आणखी एका युजरने म्हटलं, ‘या चित्रपटात कथाच नाही. त्यात फक्त सलमान स्लो मोशनमध्ये चालताना दिसतोय आणि एआयच्या मदतीने त्याला एकदम फिट दाखवलंय. दबंगमधला सलमान आणि या सलमानमध्ये खूप फरक आहे.’ काहींनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांवरही नाराजी व्यक्त केली. ‘ॲक्शन आणि सामाजिक संदेश आहे परंतु एका ठराविक टप्प्यानंतर सर्वकाही जुनंच वाटतं’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. काहींनी यातली सलमानची भूमिकाच समजली नाही. तर काहींनी हा चित्रपट फ्लॉप होईल असा दावा केला आहे. ईदच्या दिवशीही ‘सिकंदर’च्या शोला प्रेक्षक नसल्याने हा चित्रपट फ्लॉप ठरेल, असं म्हटलं गेलं.

सलमान खानचं अभिनय

अनेकांनी या चित्रपटातील सलमानच्या अभिनयावरही टीका केली. ‘माझ्या आयुष्यातील हा सर्वांत वाह्यात चित्रपट होता. यात सलमानने जो अभिनय केला, तो अत्यंत वाईट आहे’, असं प्रेक्षकांनी म्हटलंय. चित्रपटातील सलमानच्या एकंदर लूकबद्दल काहींनी टीका केली आहे. ‘मजाच आली नाही. सलमान नव्हे तर दुसरंच कोणीतरी सलमानची भूमिका साकारत होतं, असं वाटत होतं’, असं नेटकऱ्यांनी लिहिलं आहे. काहींनी तिकिटाचे पैसे परत करण्याचीही मागणी केली आहे.

‘सिकंदर’ची कमाई

सलमान खानच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 26 कोटींचा गल्ला जमवला आहे. सलमान खानचा चित्रपट असून आणि पहिल्याच दिवशी सुट्टी असूनही प्रेक्षकांकडून थंड प्रतिसाद मिळाला. याउलट विकी कौशलच्या ‘छावा’ने पहिल्या दिवशी 31 कोटी रुपये कमावले होते. ‘सिकंदर’मध्ये सलमान खान, रश्मिका मंदाना, काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर, शर्मन जोशी आणि सत्यराज यांच्या भूमिका आहेत.