Madhu Kambikar Passes Away: नाना पाटेकरांनंतर सिनेसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन
Madhu Kambikar: ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं निधन झालं. त्या केवळ अभिनेत्री नव्हत्या, तर लोककलेचा वारसा जपणाऱ्या समर्थ लावणी कलावंतही होत्या.

Madhu Kambikar: मराठी लोककला आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू कांबीकर यांचं पुण्यात निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. दीर्घ आजारातून त्यांचं निधन झाल्याची माहिती, सुनेनं दिली. गेल्या काही वर्षांपासून त्या अंथरुणाला खिळून होत्या. रंगमंचावर लावणी सादर करत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून मधू कांबीकर यांनी आपल्या कलेची छाप पाडली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देण्यातही त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलं आहे.
मधू कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द इथं झाला. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी कलाक्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं. कथ्थक नृत्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर 1973 मध्ये मुंबईतील लालबाग इथल्या न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. लावणी आणि लोकनृत्याच्या सादरीकरणातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.
मधू कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘सतीची पुण्याई’, ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केलं. चित्रपटांसोबतच लोकनाट्य आणि रंगभूमीवरही त्या सक्रिय होत्या. 1977 मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्लीमध्ये नृत्यनाट्य सादर केलं. त्यांच्या लावणीतील सहजता, अभिनय आणि हावभाव यामुळे त्यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली.
100 हून अधिक चित्रपटांत अभिनय
‘शापित’, ‘हेच माझं माहेर’ आणि ‘राघू मैना’ यांसारख्या चित्रपटांतील कामासाठी त्यांना पुरस्कार मिळाले. ‘सखी माझी लावणी’ या कार्यक्रमातून त्यांनी लावणीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अमेरिका, दुबई, अबुधाबी आणि मॉरिशस इथंही या कार्यक्रमाचे प्रयोग झाले. अनेक नवोदित कलाकारांना त्यांनी लावणीचं प्रशिक्षण दिलं. लोककलेशी असलेली नाळ कायम जपत मधू कांबीकर यांनी आपल्या चार दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत मराठी मनोरंजनविश्वाला समृद्ध केलं.